Friday 3 June 2011

पालकनीतीचा आत्मप्रत्यय


समीक्षा नेटके


पालकत्व आणि ब्लॉगिंग यांच्यात काहीतरी साम्य आहे!


ज्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीतल्या मराठीभाषकांकडे मराठीतून ब्लॉग लिहिण्याइतकी ऊर्मी असते,त्यापैकी बहुतेकांना मिळेल ते मराठी वाचण्यातही रस असणारच, असं गृहीत धरूया. ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर गेल्या 20 वर्षात नियतकालिकं, दैनिकं यांनी इतक्यांदा काही ना काही छापलंय की, हे काही ना काही वाचलेले ब्लॉगरही बरेच असणार. तरीही पालकत्वाच्या अनुभव-कथनाचा भाग अनेक मराठी ब्लॉगांवर ब-याचदा आलेला आहे. असं कसं काय? या ब्लॉगरांनी चांगलं लिहिलंय, हे आपण पाहूच, पण लिखाणात घिसेपिटे विषय टाळावेत, याची जाण असलेल्यांना ‘पालकत्वाची जाण’ या फार वेळा लिहून झालेल्या विषयावर पुन्हा का लिहावंसं वाटतं?

वाटणारच, याला एक मजेदार कारण आहे : पालकत्व आणि ब्लॉगिंग यांच्यात काहीतरी साम्य आहे!

पालकत्वाचे अनुभव किंवा उपदेश वाचून कोणी पालक होत नाही, तसं इतरांचे ब्लॉग खूप वाचले आहेत म्हणून कोणी ब्लॉगर होत नाही. पालकत्वाची जाण स्वत:च्या घरातच येते, जसं ब्लॉगिंगही स्वत:च्या ब्लॉगवरनंच सुरू होतं. हे दोन्ही प्रकार ‘स्वान्त’ असतात की नसतात हे लोकांना ठरवूंदे; पण ते ‘स्वारंभ’ असतात हे मात्र नक्की. आपली मुलं हे आपलं‘एक्स्टेन्शन’ आहेत, ही जाणीव तर माणूस या प्रजातीत जैव-मानसिकच म्हणावी लागेल. पण आपला ब्लॉग हाही आपलं एक्स्टेन्शच मानला जातो की.. त्याला ‘जैव-मानसिकता’ सारखा कुठला शब्द वापरणारोत आपण? ई-मानसिकता?

बारावीचा निकाल नुकता लागलाय, शाळाही सुरू होणार आहेत, सुट्टीत कुठेकुठे जाऊन मंडळी परतू लागलीत आणि पुढल्या आठवडय़ाभरात शाळेसाठीच्या खरेदीची धावपळ सुरू होणार आहे. याबद्दल ब्लॉगजगतात कायकाय सापडतं, असं लिहायचं मनात होतं. पण खरेदीची वा सुट्टीची ती वर्णनं, भाच्या-पुतण्यांच्या निकालानंतर स्वत:च्या निकालाच्या वेळच्या आठवणी,यापेक्षा निराळंच काहीतरी सापडू लागलं! हे जे सापडलेलं आहे ते थेट, पालकत्वाची जाण अनेक पालकांमध्ये कशी समृद्ध होते आहे, हेच सांगणारं होतं. म्हणून मग आजचा ‘ब्लॉगार्क’ सरत्या सुट्टीपुरता न राहता, तो जरा जनरल झालाय.. पालकत्व हा विषय नव्हे, पण ती जाण ब्लॉग-लिखाणातून कशी वाढतेय हे इथं दिसेल.

नोंदवणं, लिहिणं - आपलं लिखाण लोक वाचू शकणार आहेत याचं भान असणं, यातून एक निराळीच प्रक्रिया सुरू होते. बेडरूममध्ये, अगदी बेडवर लॅपटॉप ठेवून तुम्ही लिहित असलात तरी एकदम शंभरजणांपुढे बोलू लागला आहात, असा आवाज तुमच्या शब्दांना येत असतो. पत्रलिखाणासारखी जवळीक- इंटिमसी जरी ब्लॉगलिखाणात कुणी साधली असेल, तरीही हे पत्र खासगी न राहता पुस्तकरूपी पत्रसंग्रहातल्यासारखं आपल्या ब्लॉगवरून कोणीही वाचणार आहे, याचं भान असतंच. खासगी आणि सार्वजनिक जीवनाची अशी सरमिसळ डिजिटल जमान्यात होतच असते. त्यामुळे ‘कथापौर्णिमा’ या ब्लॉगच्या कर्त्यां पूनम छत्रे http://kathapournima.blogspot.com/2011/05/blog-post.html  यांना स्वत:च्या डोळ्यात पाणी आल्यावर रिअ‍ॅलिटी शो आठवतात.. ‘‘मला अचानक टीव्हीत दिसणारे ते सो कॉल्ड रिअ‍ॅलिटी शोज आठवले. विशेषत: लहान मुलांचे शो! मुला/मुलीचं कौतुक केलं की आईवर क्लोजप. ती माता बिचारी रडत असणार. मग तिला बोलतं करणार. ती म्हणणार- याला बघून खूप अभिमान वाटतोय, माझं स्वप्न आज याने पूर्ण केलं! आपण मान डोलावणार. आणि चॅनलचा टीआरपी वाढवणार. पण काल तलावावर कॅमे-याने कोणी शूट करत असतं ना, तर माझ्यावरचा कॅमेरा त्यांनी हटवला नसता. माझा मुलगा तोडकं मोडकं का होईना पोहतोय हे बघून मी चक्क माझ्याही नकळत घळाघळा रडायला लागले होते!!
 म्हणूनच जेव्हा आज माझा मुलगा पोहतो, त्या जागी मी स्वत:ला पाहते. त्याच्या चेह-यावरचा आनंद माझा असतो. खरंतर उन्हाळ्यात प्रत्येक तलाव मुलांनी भरलेला असतो. सगळेच पोहायला शिकतात. ऑफिसच्या वेळा सांभाळत आम्हाला त्याला फक्त हा एकच क्लास लावता येतो, हाही एक योगायोगच. त्या हजारो मुलात माझाही एक आहे, हा आनंद, हे समाधान माझ्यासाठी वेगळंच आहे. नो वन्डर, त्याला पोहोताना पाहिलं, की माझीही ‘रिअ‍ॅलिटी मम्मी’ होऊन जाते!’’

पुढे पूनम यांनी ‘माझ्या पालकांनी माझं नाव शिकाऊ पोहोणा-यांच्या यादीत कधीच का नाही घातलं ’ अशी खंत ब्लॉगावली आहे. पण वाचक म्हणून आपल्याला आठवेल तो ‘रिअ‍ॅलिटी मम्मी’ हा शब्दप्रयोगच!
 ‘‘लहान होता तेव्हा माझ्या हाताला घट्ट पकडून चालायचा. आता माझ्या बाळाचा हात माझ्या हातापेक्षा मोठा झालाय. कसे समजावून सांगू? प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण हवे असते. मीही समजावून सांगत असते पण आई जगापेक्षा लहान आहे. त्यालाच अनुभव घ्यावा लागणार आहे. मी कुठपर्यंत पोहोचणार?’’

असं एक वाक्य ‘अनुक्षरे’ http://anukshre.wordpress.com/2010/01/06/ या ब्लॉगवर सापडलं आणि ‘आई जगापेक्षा लहान असते का?’ या प्रश्नाची भिंतच समोर उभी राहिली. या ब्लॉगच्या लेखिकेनं दूर राहून शिकणा-या, तिथं घरावेगळेपणामुळे अंगभूत शहाणपणानं वागणा-या, तरीही आसपासच्या मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्यावर आईचाच आधार शोधणा-या मुलाबद्दल लिहिलं आहे.

या दोन आई, आजच्या प्रातिनिधिक आहेत का? बाबा मंडळी काय करताहेत, ब्लॉगवरली?

‘तारे जमीं पर’ आणि ‘चक दे’ सिनेमांवर लिहिता-लिहिता आपण स्वत: बापाच्या भूमिकेतून कसे वागणार, याचं मर्मग्राही टिपण करणारे विशाल गाढवे यांनी ‘काही मनातलं’ या ब्लॉगवर फार काही लिहिलेलं नाही. पण ब्लॉगवरल्या अगदी मोजक्या नोंदींपैकी एकीत ते म्हणतात,

‘‘ जर मी ईशान्तच्या वडिलांच्या जागी असतो तर मी काय केले असते? आय वॉज शॉक्ड.. मी देखील मिस्टर अवस्थी- ईशान्तच्या वडिलांप्रमाणेच रिअ‍ॅक्ट झालो असतो. इनफॅक्ट, आपण तसेच रिअ‍ॅक्ट होतो. परीक्षेत चांगले मार्क मिळत असतील तरच मुलगा हुशार. अन्यथा ढ.. हे असं का? परीक्षा, अभ्यास, मार्क म्हणजेच सर्व काही का? मुलांचा आनंद महत्त्वाचा नसतो?’’

विशाल गाढवे http://vishalgadhave.blogspot.com/2008/01/blog-post_24.html यांचा ब्लॉग-ओळखीतला फोटो (तोही 2008 चा) पाहिल्यास, यांना पालकत्वाचा अनुभव असेलच याची खात्री नाही देता येत, पण पालकत्वाची जाण स्वत:पासून सुरू होते, हे अधिक खरं.. त्यासाठी मूल आत्ताच असलंच पाहिजे, अशी अट कुठेय?

अभिलाष मेहेंदळे http://hitgooj.blogspot.com/2010/08/blog-post.html  हे ‘शिक्षणाशी संबंधित व्यवसायाशी निगडित’आहेत.. (पुणेरी विषयांतर : त्यांनी ‘निगडीत’ लिहिलंय, पण प्राधिकरणात की गावात हे सांगितलं नाही) म्हणून त्यांना पालकत्वाबद्दल थिऑरेटिकली बरंच बोलता येणार, अशी कल्पना आपण करू शकतो. ‘मोठेपण दे गा देवा’ या ब्लॉग-नोंदीतला त्यांचा सूर काहीसा कोरडेपणानं थिअरी सांगण्याचा- जरा पुरुषीच आहे, पण त्यातली भावना खरी आहे आणि मुख्य म्हणजे, पालकत्वाची जाण ‘नकळत’ समृद्ध होणंच महत्त्वाचं असतं हे मान्य असल्यास, अशी नकळत समृद्धी त्यांच्या या नोंदीत आहे..

‘‘साधारणत: पाच ते 15 वर्ष वयोगटातील मुलांची सहसा अशीच कुचंबणा असते. पाचव्या-सहाव्या वर्षानंतर मुलांना थोडं थोडं कळायला लागतं. पण त्याचवेळी ते ‘क्यूट’ या फेसमधुन बाहेर पडू लागत असल्याने त्यांचं कोडकौतुक कमी व्हायला लागतं आणि त्यांच्यावर दमदाटी, त्यांना लहानसहान कामं सांगणं इत्यादी सुरु होतं. ‘लहान आहेस तो पर्यंत मजा करून घे, पुढचं आयुष्य म्हणजे रौरव नरक’, असंही त्यांना ऐकवलं जातं, पण हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नसणं, या एकमेव पण अत्यावश्यक बंदीमुळे त्याला विशेष अर्थ राहत नाही.

पालक चुकीचं वागतात असं मला सूचित करायचं नाहिये. पण जेव्हा जेव्हा मी ऐकतो की लहानपणी मजा असते, मोठेपणी सगळं नाहीसं होतं, हे मला तरी मान्य नाही. मी लहान असताना इतरांप्रमाणे रात्री कितीवेळ बाहेर राहाणे, किती आणि कोणते सिनेमे बघणे, महिन्यात कितीवेळा हॉटेलात मित्रांबरोबर खाणे, किती वेळ टि.व्ही. बघणे इ. ला मर्यादा होत्या. अर्थात त्या आवश्यक होत्या. आता मी विवाहीत आहे. मला सहा महिन्यांची मुलगी आहे, त्यामुळे अर्थातच जबाबदा-या आणि ताण आहेत, पण निर्बंध नाहीत. अर्थात मी अव्याभिचारी अनिर्बंधांबद्दल बोलत नाहिये. पण मी कधीतरी उशीरापर्यंत टि.व्ही. बघितला किंवा उगीचच एखादी वस्तू विकत घेतली, तर मला कुणी दमदाटी करणार नाही किंवा जाब विचारणार नाही. ही स्वातंत्र्याची भावना आपण किती सहजतेने दुर्लक्षितो? बहुधा या भावनेसाठीच लहान मुलांना लवकरात लवकर मोठे व्हावेसे वाटते.’’
 लवकर मोठं व्हावंसं वाटतं म्हणजे काय, याच्या किस्सेवजा नोंदी पाहूच कधीतरी.. पण आजचा ब्लॉगार्क स्वारंभ पालकनीतीच्या आत्मप्रत्ययापुरताच मर्यादित ठेवलेला बरा! 

Sunday 15 May 2011

शैली आणि माहिती, मतं आणि आच!


समीक्षा नेटके हे नाव आता ब-याच मराठी ब्लॉगरांच्या ब्लॉगांवर, ‘फॉलोअर्स’ म्हणजे ‘सदस्यां’च्या यादीत तुम्हाला पाहायला मिळेल. सदस्यता नसलेले ब्लॉग अर्थातच, या सदराच्या निमित्तानं वाचले जातात. मात्र, ब्लॉगचं वाचक-सदस्य झाल्यावर त्या ब्लॉगशी जोडलं गेल्यासारखं वाटतं, असा अनुभव अनेकांचा असेल. मग त्यापैकी एखादा ब्लॉग शैलीसाठी, दुसरा माहितीमुळे तर तिसरा मतांकरता लक्षात राहतोय,असंही होत असेल. असे तीन नमुने (‘आदर्श’ नको, नमुनेच बरे!) ठरणा-या तिघांचे ब्लॉग अगदी गेल्या चार दिवसांतच नव्यानं ‘अपडेट’ झालेले दिसले. व्यक्तिमत्त्व ब्लॉगमध्ये कसं उतरतं, याचा वस्तुपाठ आहेत हे तिघे! तसे आणखीही ब्लॉगर असणारच, कारण व्यक्तिमत्त्व ब्लॉगमध्ये उतरत नाही असं दिसलं की तो ब्लॉग जणू, लेखकाचा राहातच नाही आणि म्हणून- अशाच कारणासाठी अनेकांचं ब्लॉगलेखन थांबतं, थांबलंय. इथं खरंच कुणाचा उल्लेख आणि कुणाचा अनुल्लेख असं काही करायचं नाहिये.. ब्लॉगर.कॉमवरून सदस्यता घेतलेल्या 51 पैकी हे तीन ब्लॉग, म्हणजे उणेपुरे सहा टक्के! तरीही हे‘सँपल’ यथास्थित आहे, असं वाटलं आणि मुख्य म्हणजे या तिन्ही नोंदी वाचनीयच वाटतील, तुम्हालाही.

अभिजीत पुण्याचा आहे, हे त्याच्या ब्लॉग-नोंदींतल्या काही सांस्कृतिक आग्रहांवरूनही लक्षात येतं. ‘डीएसएलआर कॅमेरे- काही गैरसमज’ या ब-याच आधीच्या नोंदीचं नाव वाचून, ‘इथं अभिजीतची खुसखुशीत मतं नसतील, नुसती माहिती असेल,’ म्हणून वाचायला घेतलं तर इथंही (गं)मत आहेच! ‘डीएसएलआर कॅमेरा माझ्यासाठी आहे’ हा गैरसमज क्रमांक चार- आणि अखेरचा- अभिजीतनं ज्या तिखटपणे खोडलाय, त्यात त्याचे ‘सांस्कृतिक आग्रह’ दिसतील आणि ते आग्रह सुसंस्कृतदेखील आहेत, हे कळेल. अभिजीतची ताजी नोंद ‘फॉरवर्ड’ म्हणून पाठवावी असा मोह होण्यातली आहे (सांभाळा अभिजीतपंत.. हवं तर कॉपीगार्ड लावून घ्या!) ‘प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न’ या नोंदीची सुरुवातच, ‘‘एवढय़ा मोठमोठय़ा जाहिराती दाखवायला या टेलिमॉल नि स्कायशॉपवाल्यांकडे पैसा येतो कुठून? म्हणजे लोक खरंच त्यांच्या वस्तू खरेदी करतात? नजर रक्षा कवच आणि इंग्लिश गुरू ‘पैसे देऊन’ विकत घेणारे लोक या जगात आहेत?

स्वत:चं पुन्हा पुन्हा कौतुक करताना आपण किती हास्यास्पद दिसतो हे सचिन पिळगावकर साहेबांना कधी कळणार?’’

अशी आहे आणि शेवट,

‘‘पुण्याच्या वाहतुकीची दिवसेंदिवस अवघड होत जाणारी स्थिती पहाता काही वर्षानी ‘आम्ही स्वारगेटवरून शिवाजीनगरला एका तासात पोहोचत असू’ असं एखादे आजोबा आपल्या नातवाला सांगतील का?
 आयपीएल स्पर्धा जर वर्षातून तीनदा भरवली तर सध्याच्या तीनपट पैसे गोळा करता येतील हे आयपील आयोजकांच्या अजून लक्षात कसे आले नाही?’’
असो! संकीर्ण मतं आहेत ही, त्यामुळे या नोंदीच्या मजकुरात ओघ, सातत्य काही नाही. थोडी आयटमगिरी. एकेक वाक्यं.‘फॉरवर्ड’साठी उत्तम फॉर्म.

याउलटआनंद घारे  हे तारापूर अणुऊर्जा केंद्रातून निवृत्त झालेले, अणुभौतिकीचा अभ्यास आणि कुतूहल कायम ठेवणारे काका. त्यांनी याच आठवडय़ात ‘अणुऊर्जेपासून विजेची निर्मिती- भाग दोन’ ही नोंद प्रकाशित केलीय. घारे यांचा अभ्यास दांडगा, अधिकार मोठा आहे, हे त्यांचा ‘आनंदघन’ नावाचा ब्लॉग वाचताना जाणवतंच. घारे यांच्याकडे संशोधकी वा शास्त्रीय वृत्तीमुळे आलेला खुलेपणाही आहे.. उदाहरणार्थ, दोनेक महिन्यांपूर्वी ‘मोलेक्युल’ आणि ‘अ‍ॅटम’ला ‘अणू आणि परमाणू’ म्हणणा-या घारे यांनी 13 एप्रिलच्या नोंदीत लिहिलंय की, हे मराठी प्रतिशब्द चुकीचे असल्याचे मला या लेखांवरील चर्चेतून जाणवले. त्याऐवजी, सध्या जे अणु आणि रेणू हे शब्द आता प्रमाणभाषेत दिले जातात असे समजल्यामुळे मीही त्याच शब्दांचा वापर करेन! फुकुशिमा आणि जैतापूर हे राजकीय चर्चेचे विषय ठरल्यानंतर अनेकांनी अणुऊर्जाच ‘व्हिलन’ असल्याप्रमाणे बोलायला सुरुवात केली, अशा वेळी घारे यांनी हे लिखाण केली आहे. आधीचे तीन लेख झाल्यावर त्यांना कुणी ‘याचं पुस्तक चांगलं होईल’ हे सांगितलं की नाही माहीत नाही; पण मे महिन्यात त्यांनी अणुऊर्जा- वीजनिर्मिती यांचा इतिहास मांडणारं लिखाण सुरू केलं आहे. इतिहास लोकांना आवडायला हवा म्हणून घारे काही ‘अणुशाहीर’ नाहीत झालेले.. वैज्ञानिक काटेकोरपणा त्यांनी सोडलेला नाही, तरीही लोकांना समजेलशी उदाहरणं ते देतात. अणुभट्टीची ‘क्रिटिकॅलिटी’ म्हणजे काय, हे त्यांनी खूप सोपं करून सांगितलंय..

‘‘रिअ‍ॅक्टरमधले कॅड्मियम रॉड अनेक न्यूट्रॉन्सना गिळंकृत करत असल्यामुळे सुरुवातीला फिशन चेन रिअ‍ॅक्शन टिकत नव्हती. हे रॉड हळूहळू वर नेत गेल्यानंतर त्यांचा प्रभाव कमी होत गेला आणि असा क्षण आला की ही भंजनांची साखळी पुढे आपल्या आप चालत राहिली. याला ’क्रिटिकॅलिटी’ असे म्हणतात! त्यानंतर कॅड्मियम रॉड आणखी वर उचलले असते तर रिअ‍ॅक्टर ’सुपरक्रिटिकल’ झाला असता म्हणजे भंजनांची संख्या वेगाने वाढत गेली असती आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या ऊष्णतेची तीव्रता वाढत गेली असती. कॅड्मियम रॉड खाली सोडले असते तर रिअ‍ॅक्टर ’सबक्रिटिकल’ झाला असता म्हणजे भंजनांची संख्या वेगाने कमी होत जाऊन ती थांबली असती. या पहिल्या यशस्वी प्रयोगाला आता साठ वष्रे होत आली असली तरी आजसुद्धा जगातला प्रत्येक रिअ‍ॅक्टर अशाच प्रकारे सुरू केला जातो. आता हे कंट्रोल रॉड्स हाताने ओढत नाहीत, त्यासाठी यांत्रिक व्यवस्था असते एवढाच बदल त्यात झाला आहे. ’’

.. आणि आता तिसरी नोंद.. माहिती, संशोधकवृत्ती, मतं हे सगळं आणि त्याहीपेक्षा जाणीव आणि आच ज्यांच्या लिखाणात नेहमीच दिसते, त्या ‘इंद्रधनू’ मैत्रिणींच्या ब्लॉगवरली..त्यापैकी ‘भारतीय स्त्रीचं गृहिणीकरण- 1’ या नावाची ही नोंद विद्या कुळकर्णी यांनी लिहिलीय.

ती वाचून आज थांबूया.. विचारही करूया..

‘‘इंग्रजांनी जर आमच्यावर सत्ता गाजवायला नको असेल तर आपण आधी आपल्या स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे असं नवशिक्षितांना आणि सुधारकांना वाटायला लागलं.

मग व्हिक्टोरियन इंग्रजी गृहिणी ही प्रमाण मानून इथल्या स्त्रीचं गृहिणीकरण सुरू झालं.

पहिल्यांदा हे बंगालमधे झालं आणि नंतर हे महाराष्ट्रात सुरू झालं.

स्त्रियांनी शिकलं पाहिजे, सुधारलं पाहिजे असं ठरवलं गेलं.

स्त्रीचं काम काय? तर मुले सांभाळणं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, शिवण- टिपण करून घर व्यवस्थित ठेवणं वगरे वगरे.

स्त्रीने शिकायचं का? तर मुलांना शिक्षित आई मिळावी म्हणून. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून. तिने यासाठी गणित, शास्त्र हे शिकण्याची गरज नाही, तिने गृहविज्ञान शिकावं.

तिने वावरायचं कसं, बोलायचं कसं हे ही ठरवलं जावू लागलं.

आपण का शिकायचं? शिक्षण म्हणजे काय बरं? आपण का शिकलोय?..’’

Thursday 5 May 2011

ससाबांचं ब्लॉगारोहण


‘ससाबा’ हे लघुनाम सत्यसाईबाबांसाठी ‘उपक्रम’मधल्या ‘डार्क मॅटर’नामक चर्चाकारानं 6 एप्रिलच्या चर्चेत वापरलं. विचारी निर्णयशीलपणा आणि स्थितीवादीपणा यांचं जे काही वाग्युद्ध ‘उपक्रम’ वर सुरू असतं, त्याला साजेशीच ही चर्चा आहे. सेलेब्रिटी आणि बाबा - ससाबाच नव्हे, कोणतेही बाबा, यांच्या नात्याबद्दलची मतं फक्त स्थितीवादी नाहीत, असा विश्वास या चर्चेतून सध्यातरी मिळतो आहे

‘‘गेले एकदाचे हे बाबा.. खूप दुख झाले असेल ना सचिन.. अरे सचिन तुझ्या जितक्या धावा आहेत ना तितकी कुपोषित बालके रोज मेली.. तितक्याच मुली आईच्या गर्भात मारल्या गेल्या, तितक्याच शेतक-यांनी आत्महत्या केल्या.. ना त्या पुत्तापार्थीला कंठ फुटला ना तुला ना त्या तुझा षटकार पाहून कंठ फुटणा-या लताबाई मंगेशकरांना ..’’ अशा शब्दांतलं लिखाण भावनिकच वाटणार, विचारी वाटणार नाही, हे उघड आहे. लिखाणाची धार वाढण्यासाठी, शब्द अधिक बोचरे होण्यासाठी भावनेचा भर आवश्यक आहे, हेही मान्य. पण रूढार्थानं ब्लॉग-सभ्यतेचे संकेत न पाळणारं हे लिखाण मी माझ्या ब्लॉगवर ठेवेन, कारण लोकांनी ते वाचलंच पाहिजे हा वैभव गायकवाडचा निश्चयीपणा पाहून मात्र, संकेत वगैरे बाजूला ठेवून दाद देण्याजोगा आहे. (http://www.vaibhavgaikwad.com/2011/04/blog-post_24.html)

हा वैभव गायकवाड जो ब्लॉग चालवतो, तिथं अन्य ब्लॉगांवर छापून आलेले लेखच लिंकसकट असतात. सचिनवरल्या लेखाची लिंक मात्र नाही. ‘ब्लॉगार्क’ सजग असल्यानं दररोज अनेक ब्लॉग पाहिले जातात, त्यावेळी हे लिखाण मात्र फक्त वैभवच्याच ब्लॉगवर सापडलंय. तरीही वैभवनं कॉमेंटमध्ये दावा केलाय की सचिनला हे अनावृत पत्र त्यानं लिहिलेलं नाही. ‘‘गुगलवर सचिन आणि सत्यसाईबाबा सर्च करता-करता मिळाला. मी तिकडून उचलून परत माझ्या ब्लॉगवर पोस्ट केला. सुरुवातीला लिंक टाकली होती, पण मी आर्टकिल पोस्ट करेपर्यंत मूळ आर्टकिल काढून टाकलं गेलं. त्यांना बहुतेक शिव्यांचा मार झेपला नसावा. मला काही फरक पडत नाही कुणाच्याही भुंकण्याने. मी तसंच ठेवलं आर्टकिल.

कुणाचे श्रेय लाटण्याचा हेतू नाही. एरवी मी कायम लिंक्स देत आलोय. पण या आर्टकिल संदर्भात मी लिंक न केलेले चांगले. त्यांना पडणा-या शिव्या माझ्या अंगावर घेण्यास समर्थ आहे मी.

ज्याने लिहिलं, त्याच्याकडे कारणे असतील जबाबदारी झटकण्यामागे. आपल्या देशात व्यक्तिपूजा करणा-यांना पचत नाही कुणी त्यांच्या आवडत्या व्यक्तीबद्दल बोललेले. उगाच वादात का पडावं म्हणून त्यांनी उडवलं असेल आर्टकिल. माझ्यावर नाही दबाव कुणाचा. शिवाय ते फक्त एक मत आहे, जे मी माझ्या ब्लॉगवर ठेवू शकतो इतरांना वाचायला.

राहिला विचार पटण्याचा. लेखामध्ये तथ्य आहे आणि ते उघड आहे. काल सचिनने त्या ढोंगी माणसासाठी केलेला एकूण प्रकार पाहून कुणाही विवेकी चाहत्याची सटकणे स्वाभाविक होते.. बालकांवर लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप असणा-या बाबासाठी सचिनने चाहत्यांना आवाहन करणे त्याच्या स्वत:च्या इमेजला शोभणारे नव्हते.’’

असं सागर सुरंजे यांच्या कॉमेंटला (हा लेख तुमचा की दुस-याचा, या प्रश्नाला) दिलेल्या उत्तरात वैभव लिहून जातो.. भडाभडा! तरीही वैभवच्या ब्लॉगवर त्याचं स्वत:चं लिखाण का नसावं, असा प्रश्न पडतो.
 सत्यसाईंचा बडेजाव चुकीचाच असल्याच्या मतामध्ये या बाबांचं निधन हा अडसर नाही. उलट, सत्यसाईंवरला विचारी लोकांचा राग-वैतागच निधनाच्या बातमीनंतर प्रकट होणार होता. यशस्वी मॉडेल आणि क्रिकेटपटू श्रीयुत स. र. तेंडुलकर यांनी साईबाबांपायी वाढदिवस रद्द झाल्याची उद्घोषणाच ट्विटरवरून केल्यावर आणि मीडियानं तिला टीकेऐवजी प्रसिद्धी दिल्यावर हा वैताग आणखी वाढला. मात्र, बाबांवरला आणि त्यांच्या भगतगणांवरला वैताग मराठी ब्लॉगांवर फार चांगल्या प्रकारे मार्गी लागलाय, असं चित्र सार्वत्रिक नाही. चारपाचच ब्लॉगांवर हा वैताग सापडतो. पण इथंही ‘‘आपण सामान्य लोक अशा बाबांच्या भोंदूगिरीबद्दल त्यांचे चमत्कार कसे खोटे आहेत याबद्दल बोलतो. युटय़ूबवरील त्याचे व्हिडिओ शेअर करतो या गोष्टी या (सेलेब्रिटी) लोकांना माहिती नसतात का किंवा कळत नाहीत का?
बाबागिरी आणि आपला देश कितीही प्रयत्न केलातरी वेगळा करता येणार नाही हे आपण पाहात आलो आहोत आणि पाहात राहणार आहोत असेच दिसून येत आहे. चला बाबांच्या चमत्काराची नाही तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहूयात.’’ अशी स्थितीवादी भूमिकाच जिंकते आहे! सत्यसाईंनंतर भारतात, महाराष्ट्रात किती बाबा-महाराजांनी ‘सेलेब्रिटी फॉर्म्युला’ वापरला हे आपण पाहातो आहोतच, ते सर्वजण जिंकत आहेत, अशी कबुलीच ‘विक्रम एक शांत वादळ’ या नावानं लिहिल्या जाणा-या ‘जीवनमूल्य’ नावाच्या या ब्लॉगवरून अभावितपणे मिळाली आहे. (http://jivanmulya.blogspot.com/2011/04/blog-post_25.html)

सत्यसाईंच्या कथित लीलांना थेट आव्हान देणारं आणि त्यांच्या गैर/ गुन्हेगारी व्यवहारांचा पाढा वाचणारं लिखाण जर कुठे असेल, तर ते आपण आपल्या ब्लॉगवरून लोकांपर्यंत पोहोचवलंच पाहिजे, अशी तळमळ पहिल्यांदा दाखवली ती पुण्याच्या जयंत कुलकर्णी यांनी.  (http://jayantpune.wordpress.com/2010/05/13/)रॅशनलिस्ट सोसायटीचे सरचिटणीस बाबू गोगिनेनी यांच्या ‘सत्यसाईबाबा- परत सांगितलीच पाहिजे अशी कहाणी’ या पुस्तकाचे अंश दोन भागांत 13 मे 2010 रोजी ‘माझे मराठीतील लेखन’ या ब्लॉगवर प्रकटवले. मिसळपाववरही हे लिखाण उपलब्ध होतेच. त्या लेखांवर तेव्हाही प्रतिक्रिया आल्या होत्या, ‘मिसळपाव’ आणि ‘उपक्रम’ या नेटवरल्या चर्चामंडळांमध्ये जे संस्कृतिरक्षक असतात त्यांच्यापैकी एकाने ‘घुमाके स्टाइल’ने अ‍ॅटिटय़ूड दाखवून, लेखकाच्या हेतूचा कचराच करण्याचा चमत्कारही केला होता. पण सुमारे वर्षभराने- सत्यसाईंच्या निधनानंतर पुन्हा हा लेख फेसबुकवरून ‘शेअर’ केला गेला, त्याला ताज्या प्रतिक्रियाही आल्या. यापैकी एका प्रतिक्रियेत ‘कौस्तुभ गुरव, अंबरनाथ’ याच्या ब्लॉगवर हा लेख कॉपी झाल्याचा ठपका नामवंत मराठी फोटोब्लॉगर पंकज झरेकर यांनी ठेवला आहे. मुळात जयंत कुलकर्णी यांनी ज्या पुस्तकाला श्रेय दिलं, त्या पुस्तकाचं श्रेय कौस्तुभ यांनी कायम राखलं आहे. पण जयंत कुलकर्णी यांनी ज्याचं मराठी भाषांतर ब्लॉगवाचकांसमोर दोन भागांत आणलं, तो मूळ इंग्रजी लेख तशाच दोन भागांत http://saibaba-invigilator.blogspot.com या ब्लॉगवर होता आणि त्याचं श्रेय त्यांच्या ब्लॉगवर तरी नाही. शब्दश: भाषांतर जयंत यांच्या ब्लॉगवर, तर त्या भाषांतराचा संपादित अंश कौस्तुभ यांच्या ब्लॉगवर, असा प्रकार आहे. मात्र कौस्तुभ यांची ‘‘आशा भोसले यांनी एक जावई शोध लावला. म्हणे हा मृत्यू नाही तर समाधी आहे. ’’ ही नापसंती इथं व्यक्त होते तेव्हा एपीजे अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत आणखी एकाची भर पडते! (http://kaustubhfrmamb.blogspot.com/2011/04/blog-post_7836.html)

जयंत कुलकर्णी ज्येष्ठच ब्लॉगर आहेत, त्यामुळे ही चर्चा अधिक महत्त्वाची. पुस्तकाचा उल्लेख केलात, मग आता ते कुठे मिळेल किंवा मूळ इंग्रजी कुठं आहे हेही तुम्हीच सांगा, हा आग्रह योग्य की अयोग्य, हे कुलकर्णी त्यांच्या ब्लॉगसंदर्भात ठरवतील. पण मुळाची चाड असेल, तर ती खरोखरच्या मुळापासूनच असली पाहिजे. कुलकर्णी यांनी सत्यसाईंच्या निधनानंतर कलाम/ तेंडुलकर यांच्या संदर्भात काही गंभीर चर्चा करण्याचा प्रयत्न ‘सत्यसाईबाबा, सचिन, कलाम, आणि इतर मान्यवर.. व सरकार.’ या ताज्या नोंदीत केलेला आहे. इथे त्यांना बहुधा पुरेसा वेळ मिळाला नसावा.. त्या लिखाणाचा एकंदर सूर जाणण्यासाठी ते वाचावं, पण ‘बंगालमधला कम्युनिस्ट’ आदी धोपटपाठ जयंत यांनी वापरले आहेत ते लक्षात ठेवण्याजोगे नाहीत.

जयंत कुलकर्णी यांना मानलं पाहिजे, ते त्यांनी गोगिनेनींच्या पुस्तकाचं भाषांतर देण्याआधी, सत्यसाईंवरल्या स्वत:च्या नापसंतीचं जे कारण सूचित केलं आहे त्यासाठी! ‘‘जवळजवळ सर्वजणांनी बाबा आले त्यामुळे आमच्या गावाचे रस्ते झाले ही बाबांचीच कृपा झाली असे सांगितले. याऐवजी त्यांनी रस्ते न करणा-या नोकरशाहीला धारेवर धरले असते तरी चालले असते. बाबांच्या कार्यक्रमासाठी नोकरशाही राबली असेलच. पोलिस तर निश्चितच राबले असतील. याचा खर्च आपल्या खिशातून गेला आहे हे लक्षात घ्या.’’ असं जयंत लिहून जातात. हा प्रवाही विचारशीलपणा जयंत यांच्या लिखाणात नेहमीच दिसतो.
 ‘ससाबा’ हे लघुनाम सत्यसाईबाबांसाठी ‘उपक्रम’मधल्या ‘डार्क मॅटर’नामक चर्चाकारानं 6 एप्रिलच्या चर्चेत वापरलं. विचारी निर्णयशीलपणा आणि स्थितीवादीपणा यांचं जे काही वाग्युद्ध ‘उपक्रम’ वर सुरू असतं, त्याला साजेशीच ही चर्चा आहे. सेलेब्रिटी आणि बाबा - ससाबाच नव्हे, कोणतेही बाबा, यांच्या नात्याबद्दलची मतं फक्त स्थितीवादी नाहीत, असा विश्वास या चर्चेतून सध्यातरी मिळतो आहे. सध्यातरी अशासाठी की, चर्चेचा हा उपक्रम आपापल्याच महाविचारांच्या दावणीला बांधण्यास अनेक महाभाग समर्थ आहेतच! ‘ब्लॉगार्क’चं काम ससाबांबद्दल मतप्रदर्शनाचं नाही.. मृत्यूनंतर स्वर्ग/नरक, जन्नत/ जहन्नम, हेवन/हेल मध्ये आत्मा जात असल्याची श्रद्धा अनेक धर्मात असेल, पण त्याची चिंता इथे नको.. ससाबांचं मरणोत्तर ‘ब्लॉगारोहण’ कसकसं होतंय हे पाहणं हे मात्र आपलं काम आहे.

हापूसचे गोडवे


आंबा पिढय़ानपिढय़ा खाणारा जो सामाजिक स्तर होता तोच निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी ब्लॉग लिहिण्यातही आता अग्रेसर आहे. जातींचं अस्तित्वच मोडून-तोडून काढण्याची, विद्रोहाची गरज या वर्गाला वाटत नसल्यामुळे असेल, पण आपण जात मानत नसलो तरीही जातींचं अस्तित्व मान्य करण्याकडे या वर्गाचा कल आहे....

‘‘आजकाल हा कोकणचा राजा झिम्मा खेळायचे सोडून लपंडाव आणि खोखो (मद्रासी भावाबरोबर) हेच खेळ जास्त खेळायला लागला आहे. मी भारतात परतून चार वर्षं झालीपण दर वर्षीयंदा आंबा कमी’ हेच पेपरात वाचतोय.’’ अशी खुमासदार सुरुवात करून हापूस आंब्यावर अख्खी ब्लॉग-नोंद पुणेकर (मुक्काम वाकड) निरंजन क-हाडे यांनी लिहिलीय! (http://sukameva.wordpress.com/2010/05/17) बाकीच्यांनीही आठवणी काढल्यात हापूसच्यापण ही क-हाडेंची नोंद मुळातून वाचण्यासारखी आहे. बाकीच्या नोंदी वाचताना त्यात आत्मगत जास्त असतं. सद्यस्थिती लोकांना सांगताना आपण लोकांपेक्षा निराळं लिहिलं पाहिजेअसा विचार ब्लॉगला स्वान्तसुखाय’ मानल्यास केला जात नाही. क-हाडे मात्र सहसा,वाचनीयतेचा विचार करतात असं दिसतं.
 
पण म्हणून आत्मपर आणि स्वान्तसुखाच्या नोंदी वाचनीयच नाहीतअसंही नाही.. हापूसबद्दल तरअशा नोंदीच महत्त्वाच्या ठरतात कारण त्या एका फळाबद्दलच्या सामाजिक आठवणींचा दस्तऐवज’ ठरतात. आंबा पिढय़ानपिढय़ा खाणारा जो सामाजिक स्तर होता तोच निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी ब्लॉग लिहिण्यातही आता अग्रेसर आहे. जातींचं अस्तित्वच मोडून-तोडून काढण्याचीविद्रोहाची गरज या वर्गाला वाटत नसल्यामुळे असेलपण आपण जात मानत नसलो तरीही जातींचं अस्तित्व मान्य करण्याकडे या वर्गाचा कल आहे. काही ब्लॉग-नोंदी खूप जवळिकीनं वाचताना हे आत्मपरीक्षण याच वर्गातल्या वाचकांनाही करता येईल. उदाहरण म्हणून सगळे आंबे काही एका घराण्यातले नसायचे. कोणी देवगडचाकोणी रत्नागिरीचा. आणि घराणे जसे वेगळे तसे घराण्यात परत जातीकोणी हापूसकोणी पायरीकोणी तोतापुरी आणि पारंपरिक जातीय पद्धती प्रमाणे आंब्याला मानाची वागणूक मिळत असे. हापूसची स्वारी मानाप्रमाणे छान पेटी मध्ये वगरे असायची. या उलट तोतापुरीच्या वाट्याला कोपरयातील टोपली!’ हे शब्द नीट वाचून पहा. पुण्याच्या अभिजीतनं मनापासून आणि अगदी संवादीपणे लिहिलेली अख्खी नोंदही वाचा. जातीची उच्च-नीचता आणि जातीची उपयुक्तता यांचा थेट संबंध सध्या हापूसमध्ये जोडता येतोयअसं तरी वाटेलच ! (http://abhya.blogspot.com/2010_05_02_archive.html)
 
ब्लॉगवर मराठीत लिहिणा-यांच्याही जाती-पंथ लिखाणानुसार आहेतच.. इथं कविता करणारे फारच स्वान्तसुखाय लिखाणवाले असतात आणि त्यांना तसंच-तिथंच ठेवणं वाचकांच्याही हिताचं आहेम्हणून एरवी ब्लॉगार्क’ कविताबिवितांना दूरच ठेवणारपण सॅन होजेला राहणारे ज्येष्ठ आंबाप्रेमी गद्य- ब्लॉगर श्रीकृष्ण सामंत यांनाही लपविलास तू हापूस आंबा सुगंध त्याचा लपेल काबाठा चोखून खपेल का?’ अशा बिडंबन-ओळी सुचाव्यात इतकी गोडी हापूसमध्ये आहे. (http://shrikrishnas.blogspot.com/2008/03/blog-post_06.html आणिhttp://shrikrishnasamant.wordpress.com/2009/10/30/)  सामंतकाका मूळचे गोंयकारत्यामुळे वाचनीय लिखाणात जरा गोव्याचा उल्लेख असेल तर त्यांना स्वान्तसुख मिळत असावं! हापूसचे गोडवे गाणा-या किमान तीन नोंदी दोन ब्लॉगांवर करणा-या सामंतकाकांच्या आंबेआठवणींचा एक कप्पा गोव्यातच आहे माडकूर आंब्यात जरी हापूसच्या आंब्याचे सर्व गूण नसले तरी पिकलेल्या आंब्याचा बाहेरून दिसणारा केशरी रंगआणि त्याचा जास्त गोलट आकार,पाहून आकर्शीत व्हायला होतं.आणि चव विचाराल तर अगदी स्वर्गातलं अमृत मागे पडेल.’ असं ते अगदी ओघानं - जोगीण झालेल्या ज्यूलीच्या गोष्टीत- लिहून जातात. आणखी एक गोमंतकीय मराठी ब्लॉगर गौतम सोमण लिहितात , ‘‘आंब्यांमधील बेताज बादशहा म्हणजे हापूस. मला स्वत:ला मात्र हापूस-इतकाच आमच्या गोव्याचा मानकुराद आंबाही तेव्हढाच प्रिय आहे. शिवाय,घरचं झाड असल्याने मनसोक्त खायची सोय! ’’ (http://gsnapshots.blogspot.com/2010/05/mango-delight.html)
 
हापूसचआणि तोही देवगड/ रत्नागिरीचाचया प्रौढीला थोडा छेद देणारंकदाचित आंब्यांतल्या जातिव्यवस्थेला आव्हान देणारं काहीतरी असा आहे आडिवरेचा परिसर’ या अवीट बागले यांच्या नोंदीत सापडतं. ‘‘सरकारने फलोत्पादनाला शंभर टक्के अनुदानाची योजना राबविली आणि कातळावर आंब्याच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. त्या आंब्यालाही वेगळीच चव असते. त्यामुळे रत्नागिरीदेवगड हापूस मागोमाग आडिवरे हापूस प्रसिद्ध झाला तर आश्चर्य वाटायला नको.’’ असं ते लिहितात.. त्याची शहानिशा अर्थातच व्हायची आहे. (http://avitbagle.blogspot.com/2011/04/blog-post_21.html)
 
हे सदर नुसत्या गप्पांचं नाही आणि इथं ब्लॉग-नोंदींबद्दल पॉझिटिव्ह मतप्रदर्शन केलं जातंचपण काहीवेळा काही नोंदींना दाद देण्याचा मोह होतो तेव्हा आपण ब्लॉग या सार्वत्रिक माध्यमालाच खरी दाद देताहोतयाचीही जाणीव होते.. ‘‘कित्येक वेळा हापूस म्हणून मद्रास / बंगलोरचा टुकार आंबा घेऊन आलो आहे. मग नंतर आंब्याच्या पेटीतील पेपर पाहून कोकणातला आहे की नाही हे पाहू लागलो. कोणाला माहीतहे विक्रेते कोकणातून रद्दी आणून त्यात मद्रासचा आंबा पॅक करतही असतील.’’ हे असं स्वच्छआत्मीय आणि खुसखुशीत लिखाण- ब्लॉगांशिवाय कुठे वाचता येतं हल्ली? (माहितीसाठी : हेही वाक्य निरंजन क-हाडेंचंच)
 आंबा पिकणार आहेच यंदाहीसोबत ब्लॉगही फुलणारच आहेत. त्यामुळे ब्लॉगार्कमध्ये आंब्याबद्दलचं लिखाण एकाच भागात संपवू नयेअसं वाटतंय.. अनेक चांगले ब्लॉगर जसे भाग पाडूनलहान-लहान नोंदी लिहिताततसं आपण लिहावं,असा विचार इथं आहे. कुणी म्हणेल या सदराचं नाव ब्लॉगार्क’ आहे की ब्लॉगांबा’? .. म्हणू देत! 

Monday 18 April 2011

उन्हाळा मनातला, वळीव जनातला


उन्हाळ्याच्या चाहुलीपासून वळवापर्यंतच्या या नोंदींमधून एक लक्षात येतं की, 
उन्हाळय़ाबद्दल, त्रासाबद्दल काहीच बोललं गेलेलं नाही ...
पावसाबद्दल, सुखाबद्दल खूप उत्साहानं सांगितलं गेलंय!

‘‘आज अचानक पुण्याची दरारून आठवण येतेय. सध्या उन्हाळा सुरु झाला असेल..सगळी लोक या वर्षीचा उन्हाळा किती जास्त आहे मागच्या उन्हाळ्या पेक्षा हेडिस्कस करत असणार.’’ हे वाक्यअर्थातच मूळ पुण्याच्या आणि आता तिथं नसलेल्या व्यक्तीचं.. ही प्राची.. खाऊघर’ नावाचा ब्लॉग लिहिणारीपेशानं एव्हिऑनिक्स इंजिनीअर आणि ब्रिटनमधल्या ब्रिस्टलला राहणारी. तिच्या याच ब्लॉग-नोंदीत शेवटी-शेवटी एक वाक्य आहे, ‘‘इंग्लंड मध्ये राहिल्यावर सर्वात पहिली गोष्ट जिचं महत्व पटतंती म्हणजे उन - सध्या इकडेही हळूहळू उन्हाळा सुरू होतोय. उन्ह पहिलं की कोण आनंद होतो.. आणि इकडे पावसाचा मस्त आवाज येत नाही..’’
 
प्राचीची ही नोंद खाऊघरमधल्या बाकीच्या- प्रामुख्यानं रेसिपींपेक्षा निराळी आहे. तशी वेगळी नोंद करण्याचं कारण, ‘दरारूनकिंवा उन्हाळ्यात येणा-या घामासारखी दरदरून आलेली आठवण! उन्हाळा इथं नाही आणि तिथं असणारही जाणीव..
 
पण समजा तुम्ही इथंच आहाततर असेल का तुम्हाला उन्हाळ्याचं कौतुक?
 
‘‘माझ्याकडे मिरच्या सुकवायला जागा आहे आणि वाशीचे एपिएम्सी मार्केट घराजवळ आहे त्यामुळे दरवर्षी मसाला माझ्याकडेच बनवला जातो. ज्याने त्याने जेवढा हवा तेवढा आधीच सांगायचा. मग एके शुक्रवारी संध्याकाळची आई अवतरते माझ्या घरी. बोरिवली ते बेलापूर येणे हे तिच्यासाठी जगाच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जाण्यासारखे आहे. मग रात्री उशिरापर्यंत उद्या काय काय घ्यायचे त्याची यादी बनते. शनिवारी सक्काळीच उठून आमची वरात एपिएम्सीच्या मार्केटात.
 
दोनेक तास लागून सगळी खरेदी.. मग दुपारी घरी आल्यावर आईची अगदी घाई उडते. लगोलग मिरच्या वाळत टाकणार.
 
अगंकर आरामात. कशाला घाई करतेस?’
 
आता मसाला होईपर्यंत मी काही आराम करत नाही बघ. आणि जरा उन दाखवले की मिरच्यांचा कुटाणा पडत नाही गं.
 
हे सगळं उन्हाळ्यातच होतंयउन्हाळय़ातच लिहिलं जातंय..
  
इथंया नोंदीत आठवण कसली आहे?
 
उन्हाळ्याची नाहीमसाल्याचीही नाही.. आईची आठवण!
 
श्रावणातच जणू माहेरची आठवण होतेअसा प्रघात स्त्रीगीतांनी पाडून ठेवलेला आहेत्यापेक्षा हे ब्लॉगवरलं किती वेगळं आहेइथं आईच्या आठवणीचा ब्लॉग तिच्याशी फोनवरल्या गप्पांपासूनच सुरू होतो आणि मालवणी मसाल्याच्या रेसिपीपाशी संपतो!
 
उन्हाळ्याचं नातं गृहिणीपणाशी नक्की आहेअसं या ब्लॉग-नोंदीवरून जाणवू लागतं.. पन्हंमसालेपापड- कुरडयायांच्या आठवणी उन्हाळय़ाबद्दलच्या अनेक ब्लॉग-नोंदींनी काढल्या आहेत. पण उन्हाळ्याबद्दल दरारून’ किंवा भरभरून बोलणा-या नोंदी जरा कमीच आहेत. या उपलब्ध नोंदींचा सूर आठवणवजाच आहे! उन्हाळय़ात पाहुणे यायचेकौटुंबिक बोलणं व्हायचं,तेव्हाचं एकेकाचं बोलणंसुद्धा या ब्लॉग-नोंदींसारखंच असेलअसंही वाटू लागतं!
 
प्राची यांच्यासारखी दुसरी दूरदेशीची माहेरवाशीण कांचन. त्यांनी मिशिगनच्या उन्हाळ्याबद्दल लिहिताना एवढास्सा इथला उन्हाळा लोक कसा साजरा करतातजागोजागी समर मार्केट’ भरतातयाचा उल्लेख केला आहे आणि एवढे लोक बघूनच बरं वाटतं’ असा सूरही लावलाय. भारतात नसलेले एक भारद्वाज’ म्हणून आहेतत्यांनी काही धनिक अमेरिकनांची समर हाउसेस’ असतातअशी नोंद केली आहे. पण उन्हाळा हा या नोंदींचा मुख्य विषय नाही!
 
एक अपवाद आहे.. पुण्याची एक तरुण आणि नवीनच ब्लॉगर आहे सायली चौधरी. सहज कधीतरी’ हे तिच्या ब्लॉगचं नाव योग्यच वाटेलअसं ती लिहिते. शब्दयोजना चपखलपण वाक्यरचना मात्र अनघड ओबडधोबडही! अभ्यासू मुलींमध्ये दिसणारं समंजसपणा आणि अल्लडपणाचं मिश्रण  तिच्या लिखाणात आहे. ती लिहिताना कुठलीही पोज न घेणारी ब्लॉगर आहे. प्रसंगी ती स्वत:वरही विनोद करू शकतेम्हणूनच बहुधा ती कवितापंथाला न लागता गद्यलिखाण करू लागली! अनाग्रही गद्यातला संज्ञाप्रवाह ती छान सांभाळते..
 
कितीतरी गोष्टी .. उन्हाळ्याच्या..!!’ या शीर्षकाच्या नोंदीत तिनं लिहिलंय.. ‘‘पुण्याचा उन्हाळा म्हणजे रखरखीत ऊन अन् दुपारी गरम झळा पण संध्याकाळ होताच मंद थंड वारा.!’’, ‘‘डोक्यावर स्कार्फनखशिखांत त्वचा सूर्यापासून वाचवणा-या मुली. सनकोटग्लोव्हजची खरेदी करणा-या असंख्य बायका..’’ पण सायलीलाही आवडतो तो पावसाळाच.. पुण्याला गेल्याच आठवडय़ात वळवाचा पाऊस झालातेव्हा सायलीनं नजरेला भावते ते सर्व काही..’ अशा नोंदीत हे लिहिलं :
 
‘‘पहिल्या पावसानंतर सांज खुलते अगदी तसेच रंग काल आकाशाने धरले होते. आज ऑफिसमधे असताना सरी यायला सुरुवात झाली. आंब्यांसाठी हळहळ पण तरीही थंडाव्याने आम्ही सुखावलो होतो. साडेसहाला सुटले तशी गाडी जोरात हाकत घरी आले आणि तडक गच्चीत गेले. पुण्यात सहकारनगरला जरा डोंगरावरच घर असल्याने गच्चीतून जवळजवळ निम्मं पुणं दिसतं. पाऊस सुरू झाला तसं टप्प्याटप्प्याने भिजणा-या पुण्याला बघताना मनोमन मी पण भिजत होते. अशा वेळी लाईट गेले तर ढगांचे गुलाबी केशरी रंग आणि मधेच कडाडणा-या विजेच्या लखलखाटात कितपत दूर शहर दिसतंय हे बघायचा पोरकट प्रयत्न होतो.’’
 
वळीव ही चीजच अशी आहे की, ‘मी तो अनुभवला’ हे सांगण्याचा मोह कुणालाही होतोच. चिंचवडच्या सागर बोरकरनं यंदाच्या वळवात सिक्सरच मारलाय- सहा-सात प्रकारचे फोटोच टाकलेत सरळ ब्लॉगवर. ‘‘नुकताच अर्ध्या तासापूर्वी आमचे येथे चिंचवडला वळवाचा जोरदार पाउस झाला. हा या मौसमातला पहिलाच पाउस आणि तोही गारांसह. तेव्हा यानिमित्ये जमेल तशी काही छायाचित्रे घेण्याचा मोह आवरला नाही’’ असं सागर लिहितो.  
 
वळवानंतर जो मृद्गंध येतोत्याबद्दलची एक खूप खरी कॉमेंट ब्लॉग-जगतातच सापडली होती एकदा. मूळ नोंद बहुतेक,आवडते वास अशी काहीतरी होती. तर कुणा सागरनं (हा सागर बोरकर नसेल) कॉमेंटमध्ये लिहिलंय :
 
‘‘कालचीच गोष्ट.. वळीव पडला..
 
मला आजकाल वाटायचं मृद्गंध’ हा शब्द खूप क्लीशे झालाय.. सगळेच वापरतात कुठेहीकसाही.. पण काल आला तो. मातीचा मंद वास.. क्लीशे ब्लीशे गेले उडत.. मातीचा वास तो मातीचा वासच !!’’
 
हा सागर ब्लॉगर आहे की नाहीमाहीत नाही. पण त्याची भाषात्यामागची तरुण तडफ मुद्दाम पुन्हा वाचून पाहा. हा सागर लिहीत असेलतर कधीतरी सापडेलच ब्लॉगजगतात.
 
उन्हाळ्याच्या चाहुलीपासून वळवापर्यंतच्या या नोंदींमधून एक लक्षात येतं कीउन्हाळय़ाबद्दलत्रासाबद्दल काहीच बोललं गेलेलं नाही. पावसाबद्दलसुखाबद्दल खूप उत्साहानं सांगितलं गेलंय!
 लिखाणाचा खरा ऋतू पावसाळाच बहुधा. आनंद हीच महत्त्वाची अनुभूतीआणि सांगण्याजोग्या अनुभूतीखेरीज लिहायचं नाहीअशा धारणेमुळे पावसाळ्याबद्दलच लिखाण जास्त होत असावं. उन्हाळा आठवणीपुरता बरा.. पण अनुभव हवा पावसाचाच! 

Tuesday 12 April 2011




ब्लॉगर लोक किती फास्ट असू शकतातयाचा पुरावा दोन एप्रिलरोजी पुन्हा मिळाला. इकडे ढोणीनं षटकार मारताच तिकडेकाय वाट्टेल ते’ या महेंद्र कुलकर्णी यांच्या ब्लॉगवर अक्षरं-जिंकलो’!!! लगेच दुस-या दिवशी सकाळपर्यंत त्यावर 12 प्रतिक्रियाही आल्या.‘‘अशा प्रसंगी प्रत्येक भारतीय, ‘मी’, ‘आम्ही’ या संज्ञा विसरूनआपण’ होतो.’’ अशी एक प्रतिक्रिया याच ब्लॉगवर उल्हास भिडे यांनी दिली होतीती खरीच असल्यासारखं वातावरण चार एप्रिलपर्यंत नक्कीच टिकलं होतं. रस्तोरस्ती जल्लोष- आनंद आणि तो बहर संपल्यावरही ज्याच्यात्याच्या मुखी विश्वचषक-विजयाबद्दलच्याच गप्पा! याच वातावरणात अनेकजण ब्लॉगिंगही करत होते.
  
आपापल्या परीनं विश्लेषणही काही हौशी मराठी ब्लॉगरांनी केलं. ‘‘यावेळेचा विश्वचषक मला खास वाटला तो खेळाडूंमधे दर सामन्यात दिसलेल्या विजयी वृत्तीमुळे. भरपूर क्षमता पण चिकाटीचाजिद्दीचा अभाव आणि पडखाऊ वृत्ती हे खेळांमधे (त्यात क्रिकेट आलेच) भारताचे नेहमीच दुखणे राहिले आहे. पण यावेळी चित्र वेगळे होतेयावेळी प्रत्येक सामन्यात दिसली ती भारताची आक्रमकताविजय खेचून आणण्याची वृत्तीलढवैय्येगिरी. आणि माझ्या मते हेच खूप महत्त्वाचे आहे. नशिबाने रडतखडत सामने जिंकण्यापेक्षा लढून हार पत्करणे कधीही चांगलेनाही का? ’’ असं अभिजीत नावाच्या ब्लॉगरनं‘‘माझे लेखन-काही अरभाट नि काही चिल्लर!’’ या त्याच्या ब्लॉगवर लिहिलं आहे. पण पुढे अभिजीत निराळीच भूमिका घेतो : विजेत्या क्रिकेट संघात आपापल्या राज्यांतले जे खेळाडू होते,त्यांनाच बक्षिसं देण्याच्या राजकारण्यांच्या वृत्तीवर अभिजीत उखडला आहे. त्या भरात ‘‘शीला दीक्षित बाईही बक्षिसे जर सगळ्या खेळाडूंना दिली असती तर आपले सरकार भिकेला लागले असते काययाचीच री पुढे उत्तराखंडमहाराष्ट्रपंजाब नि गुजरात सरकारने आपापल्या’ खेळाडूंना पारितोषिके जाहीर करून ओढली.’’ असे कोरडेही त्यानं ओढले आहेत. मुळात ही बक्षिसं द्यायची कशालाहा विचार इथे नाही. लिहिणारा त्या क्षणी क्रिकेटपटूंवर खूष आहे!
 
अशीच खुशी अन्य काही मराठी ब्लॉगरांना होती. अविनाश वीर यांनी अंतिम सामन्यातल्या विजयानंतर अख्ख्या विश्वचषकानं क्रिकेटप्रेमींचे भावनिक प्रतिसाद कसे जागते ठेवलेयाचा अथपासूनचा आलेख चितारणारा चित्रदर्शीच लेख मी पण लिहितोय’ या त्यांच्या ब्लॉगवर लिहिला आहे
हे वर्णन ठाणे-घोडबंदरच्या एका बारपासून सुरू होतं.. 
‘‘जिंकायचेच हे धोनी आणि संघाच्या देहबोलीतून जाणवू लागले. आणि बघता बघता धोनीने (तोपर्यंत फक्त जाहिरातीत दिसणारा) हेलीकॉप्टर’ हाणला आणि आपण जिंकलो. आईशप्पथ! सगळे आनंदाने उडय़ा मारू लागले. ओळख ना पाळख सगळेच एकमेकांना (पोरी सोडून) मिठय़ा मारू लागले. मी तर वजन वाढल्यावर एवढय़ा उडय़ा मारू शकतो हे विसरूनच गेले होतो.’’ पुढे, ‘‘जल्लोष करून आम्ही आलो तलावपाळीला. फुल राडा सुरू होता. आपण जिंकलो होतो. सचिनला रडताना पाहून तर फारच भावनिक झालो’’ असं अविनाश सहज बोलल्यासारख्या आणि वाचतानाही जणू उत्साही आवाजात ऐकूच येणा-या भाषेत लिहितो. ते वाचनीय नक्कीच आहे.
 
जनसामान्यांच्या आठवणीही इतिहासासाठी मोलाच्या आहेतअसं मौखिक इतिहास ही शाखा मानते. त्या आग्रहाशी तंतोतंत जुळणारा ऐवज मराठी (किंवा अन्यभाषक) ब्लॉगविश्वात आपसूक तयार होतो आहे. अविनाश वीर यांच्या लेखावर वैभव गायकवाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत पुढे एक उल्लेख आहे, ‘‘खरं सांगायचं तर दर सामन्याला मला वाटत होतं की आज काही खरं नाही आपलं. नशीब घरात देव नाहीत-नाहीतर रोजच्या बुडवण्याने पिसाळले असते माझ्यावर.’’ ही नास्तिक-अस्तिकाचा घोळ न घालणारी खिलाडूवृत्ती आज काही टक्के मराठी तरुणांच्यात भिनते आहेअसा बारकावच आहे हा. विश्वचषक जिंकल्यानंतरचा निर्व्याज आनंदउफाळून आलेलं देशप्रेमयाचा आलेख अन्य काही मराठी ब्लॉगांवरही आहे. त्यापैकी एका ब्लॉगरनं मी मॅच असली की ऑफिसलाच जातो आणि ऑफिसच्या कम्प्युटरवरूनएका मराठी वर्तमानपत्राची वेबसाइट पाहात-पाहात इतरांना स्कोअरची माहिती देतो’ हे सांगण्यात धन्यता मानली आहे. क्रिकइन्फो’ सारख्या अस्सल आणि वेगवान साइटचा उल्लेखही त्यानं केलेला नाहीपण तो क्रिकेटप्रेमीच! अशी काही नमुनेदाऽर उदाहरणंही आहेत इथे.. पण ती एकदोनच. शिवाय, ‘मौखिक इतिहासात अशा नमुन्यांनाही स्थान असतंच की.
 
विश्वचषक जिंकल्यावर जे काही होतं तो युफोरिया- हर्षवायूसारखा परमानंद- असंच काही नाहीयाचंही भान ब्लॉगजगतातून उलगडणारा मौखिक इतिहास आपल्याला देतो. सांस्कृतिक पुणे’ या ब्लॉगवर मंगेश वाघमारेनं लिहिलेली एक पत्रवजा नोंद (हा ब्लॉग मंगेशचा नसूनही) प्रकाशित झाली आहे. मंगेश वाघमारे म्हणतात-
   
जरा याचाही विचार कराअसं मंगेशच्या नोंदीचं शीर्षकच आहे.. आपण निराळी भूमिका मांडतो आहोतयाची जाणीव लेखकालाही आहे. सुभाष इनामदार यांनी या नोंदीवर प्रतिक्रिया देऊन त्या भूमिकेचं स्वागतही केलं होतं.  ‘‘सध्याच्या वातावरणात असे काही बोलणे म्हणजे जणू धर्मद्रोह किंवा देशद्रोहच. जनांचा लोंढा ज्या दिशेने चालला आहे त्याविरुद्ध जाण्याचे धाडस दुर्मिळच.’’ असं इनामदार म्हणतात. पण इनामदारांना म्हणायचंय कायहे बहुधा लक्षात न घेता, ‘धर्मद्रोह,देशद्रोह’ असे शब्द असलेली त्यांची कॉमेंट या ब्लॉगवरून सध्या गायब झालेली आहे.
 
आता तर इनामदारही म्हणू शकतात कीमी अशी कॉमेंट केलीच नव्हती. ब्लॉगांवरला इतिहास मौखिकच उरतो तो असा!
 
स्पृहा’ या नावानं कानगोष्टी’ हा ब्लॉग लिहिणारी एकजण क्रिकेटच्या अनुभवाचं आकलन करता-करता त्याच्या पलीकडे गेली आहे. अविश्वास हा आजच्या जगातला श्वासच कसा बनलायया महत्त्वाच्या मुद्याला तिची द ट्रमन शो’ या शीर्षकाची नोंद स्पर्श करते. हे सारं या नोंदीत क्रिकेटपासनं सुरू होतंत्यामुळे ते वाचणं महत्त्वाचं ठरेल : 
 
‘‘मला क्रिकेट अतिशय आवडतं.. अगदी मनापासून.. पण गेल्या काही वर्षापासून माझा या स्पर्धावरून मात्र विश्वासच उडत चाललाय.. इतर खूपशा छान गोष्टींवरून उडत चाललाय तसाच.. हा वर्ल्ड कपही लुटू पुटूचा वाटतो.. आपण जिंकल्यावर आनंदही होतोमग लगेच वाटतंहे जिंकणं खरंअसेलएखाद्या फिल्डरच्या हातातून कॅच सुटतोमनात प्रश्नचिन्ह.. कॅचसुटला’,की सोडला’?? .. खूप वाईट वाटतं. मग..स्वत:चाच राग येतो.. आपण आपला हा आवडता खेळ,’खेळ’ म्हणून पाहूच शकत नाही. या भावनेने कोंदून गेल्यासारखं होतं.. वर्ल्ड कप.. की एक इव्हेंट’ फक्त..कोट्यावधींचा. जाहिरातीचा.. प्रायोजकांचा.. बेटिंगचा.. पैसेवाल्यांचा.अर्थकारणाचा.. सत्ताकारणाचा..साध्या-भोळ्या माणसांच्या भावनांचा.. एक खेळ’ फक्त.!!!
 
.. हे खरं की खोटंयावर वाद घाला हवंतर.. पण त्याऐवजी जरा संवाद करण्याच्या मूडमध्ये असालतर स्पृहासारखा स्वत:च्या आनंदावरलाही विश्वास उडावा असा प्रसंग कधी तुमच्यावरही आलाय कायाचा खरंच विचार करा.

Tuesday 5 April 2011

गुढीपाडव्याच्या बाजूने आणि विरुद्ध!



आज पाडव्याच्या दिवशी ब्लॉग सुरू केला’ अशी दोन वर्षापूर्वीची नोंदत्यानंतर आठवडय़ाभराने ब्लॉगवर एखादी कविता किंवा फॉरवर्ड-ईमेलवरून चिकटवलेला मजकूर आणि मग काहीच नाही. असेही नाममात्र ब्लॉगर आहेत. ब्लॉगची गुढी उभारून झालीएवढय़ा एका समाधानाखेरीज त्यांना काहीच मिळालं नसेल त्यांच्या ब्लॉगमधून. पण बाकीचे किमान तीन-चारशे रेग्युलर ब्लॉगर (हौशी मराठी लेखक) आहेतही आपल्या समाधानाची गोष्ट. काही नाही तरी, ‘गुढीपाडव्याच्या शुभेच्छायेत्या सोमवारीही अनेक मराठी ब्लॉगांवर पाहायला मिळतील. म्हणजे चैत्र-पाडव्याला गूळकडुनिंब खाणेगुढी उभारणे या उपचारांत पाचेक वर्षापूर्वी जशी शोभायात्रांची भर पडलीतशी आता ब्लॉग-नोंदींचीही भर पडते आहे.
 
गुढीपाडव्याला केलेल्या वा या सणाबद्दलच्या ब्लॉग-नोंदींमधून लेखकांचं काही चिंतन दिसतं काशुभेच्छांच्या पलीकडे या सणाबद्दल काही बोलता येतं कायादृष्टीनं शोध घेतला तर मात्र अगदी मोजके ब्लॉग हाती येतात. वयानं पन्नाशीपार गेलेल्या दोघा ज्येष्ठांनी आपापल्या ब्लॉगवर निरनिराळ्या वेळी केलेल्या नोंदी चिंतन’ म्हणावंअशा आहेत. काळाला स्वीकारण्याची हतबलता आणि तयारी या दोन टोकांच्या मधला जो टापू असतोतिथं कुठंतरी राधिका रेडकर (http://radhikaredkar.blogspot.com/2007/03/blog-post_19.html)  आहेत.  त्यांनी आपल्या लहानपणीच्या पाडव्याचं वर्णन करूनअखेरच्या परिच्छेदात लिहिलंय-
 
आज तो’ पाडवा आठवून वाईट वाटतंय का असं मी (डोळे मिटूनच ) मनाला विचारलं. मनाने हलकेच नकारर्थी मान हलवली. ते हसून म्हणालं, ‘वाईट काय वाटायचं त्यातप्रत्येक वेळचे नियम वेगळेप्रत्येक वेळच्या गमती वेगळ्या. तुला लवकर उठून आवरण्यात मजा वाटतेय नामग आवर. मस्त पैकी चहा घे कपात ओतूनबस अंगणातल्या पायरीवर. मी आहे तुझ्या सोबत. चहा थोडा जास्त कर मात्रकारण रोजच्या धकाधकीत दमलेल घर होईलच जागं चहाच्या वासाने. आणि जमतीलच सगळे तुझ्या भोवती आपापले कप भरून. त्यांच्या संगतीत आनंदाची कारंजी उडताना बघणं हे गुढी उभारण्यापेक्षा वेगळं थोडंच आहे?’ मग ती’ गुढी उभारायला थोडा वेळ लागला तर बिघडलं कुठे?
 
पांडुरंग खांडेपारकर (http://pskhandeparkar.blogspot.com/2011/03/blog-post_1008.html) हेही ज्येष्ठ नागरिक. त्यांनी गुढीपाडव्याच्या आठवणी छानच काढल्या आहेतपण अभावितपणे या सणासुदीची चिकित्साही केली आहे. अगदी लहानपणीच्याच निरागस क्षमतांनिशी.
 मराठी भाषेत लिहिणा-यांकडे वास्तवाला भिडण्याची तयारी असतेअसं हे लिखाण वाचताना वाटतं. तरुण ब्लॉगरांच्या काही नोंदींमधून तर ही तयारी अधिकच प्रकर्षानं - ड्रास्टिकली या अर्थानं- दिसते. मध्यंतरी एका कट्टर संघटनेनं गुढीपाडव्याला समर्थन आणि एकतीस डिसेंबर- एक जानेवारीच्या नववर्ष सदिच्छांनाही विरोधअसा पवित्रा घेतला होता. सुमारे 25 ब्लॉगरांनी हे आवाहन जसंच्यातसं आपापल्या ब्लॉगवर चिकटवलंते कोणत्या हेतूनंयाचे खुलासे उपलब्ध नाहीत.
‘‘आज बरंच काही खरडायची इच्छा आहे पण पेशन्स नाही. इथेच थांबतो. दारूपाटर्य़ा वाईटगुढीपाडव्यालाच नववर्ष वगरे म्हणून खट्ट असलेल्या मंडळींनाही शुभेच्छा आहेत बरं का. इथं एक सुविचार बळंच फेकावासा वाटतो. ‘‘केवळ तुम्हाला जगाबद्दल इश्शूज आहेत म्हणून जगालाही तुमच्याबद्दल इश्शूज असतीलच असं काही नाही/’’ अशी नोंद मुक्ताफळेवर अवघ्या तीन महिन्यांपूर्वी- 2011 उजाडताना नॅकोबांनी केली आहे. (http://www.muktafale.com/post)
 
महाराष्ट्राच्या ज्या-ज्या शहरांत संगणकसाक्षरता आधी पसरलीत्या-त्या शहरांत गुढीपाडव्याच्या शोभायात्रादेखील आधी निघू लागल्याअसा एक योगायोग आहे. पण या समूह-फे-यांचं वर्णन फार कुठल्या ब्लॉगवर नाही. एकविसाव्या शतकातल्या एका ब्लॉगरनं टीव्हीवर डोंबिवलीठाणेगिरगाव इथल्या शोभायात्रा पाहून त्यांचं वर्णन ब्लॉगवर केलंय! पण मी स्कूटरवर होतेअमुक रंगाची साडी नेसले होते. माझा फोटोसुद्धा अमुक अमुक पेपरात आला’ वगैरे लिहिणारी एखादी ब्लॉगरभगिनी भेटेल इथंअशी अपेक्षा फोल ठरली. बंधूंकडून ती अपेक्षा फारशी नव्हतीच. हे झालं मुंबईचंतर अमेरिकेतल्या घरात गुढीपाडव्यानिमित्त केलेल्या जेवणाच्या बेताचा उल्लेख एकदोघा ब्लॉगरांनी केला आहेतोही अन्य कुणी केलेला दिसला नाही.
 
हौशी लेखक नसलेल्या आणि व्यवसाय किंवा राजकीय विचाराशी संबंधितच ब्लॉगलेखन करणा-या लोकांची संख्या वाढते आहे. गेल्या वर्षभरात (म्हणजे अगदी आर्थिक वर्षात किंवा चैत्र ते फाल्गुन धरलं तरी) मराठी पत्रकारांपैकी साठ-सत्तरजण नव्यानं ब्लॉगजगतात (लिहिलं तिकडं की चिकटव इकडं- या पद्धतीनं) वावरत आहेत. कुंडली मांडणं किंवा ज्योतिष या व्यवसायात असलेले कितीजण असा व्यवसायाधारित ब्लॉग चालवतात माहीत नाहीपण क्रिकेटबिकेटवर लिहीत नसतात तेव्हा धोंडोपंत उवाच’ या नावाच्या ब्लॉगवर अनेकदा कुंडलीआकडेमोड आदींबद्दल वाचायला मिळतं. या धोंडोपंतांचे व्यवसायबंधू राजीव उपाध्ये. (http://rajeev-upadhye.blogspot.com/2011/03/blog-post_15.htmlत्यांनी अगदी गेल्या दहाच दिवसांत केलेली एक नोंद भारी’ या सदरात मोडणारी आहे. भारतीयांच्या मुहूर्तासंबंधी काही चमत्कारिक कल्पना आहेत. त्या ठाम विश्वासाने ते पाळतात. गुढीपाडवादसरा कोणत्याही ग्रहयोगात सापडला असला तरी ते त्याला शुभच मानतात. कोणत्याही पंचांगकर्त्यां ज्योतिर्विंदाने याची दखल घेतलेली मला तरी आठवत नाही. अशी सुरुवात करून उपाध्ये यांच्या ब्लॉग-नोंदीत चार एप्रिलला असणा-या ग्रह-स्थिती- बद्दल  तपशीलवार वर्णन केलं आहे.
 
सणाच्या शुभेच्छा एकमेकांना देण्याचे मार्ग मोबाइलपासून ब्लॉगपर्यंत पसरलेले असतानाएका राजकीय (संभाजीभक्त) ब्लॉगरनं अनेक मराठीजन ज्या विश्वासानं गुढीपाडवा साजरा करतातत्या विश्वासांच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न (छत्रपतीभक्तीतूनकेला आहे. (http://bsambhaji.blogspot.com/2011/03/blog-post.html) हा शोचनीय- म्हणजेच ज्यावर विचार करावा असा- उल्लेख मुळात असा आहे : गुढीपाडवा का साजरा करतोहा सन आपणकारण आम्हाला आमचे आई वडील सांगतात कि हा हिंदूंचा नव वर्षदिन आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम-रावणाचा वध करून अयोध्येत आले होते . त्यामुळे सर्वानी आनंदाने गुढय़ा उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण गुढय़ा उभारतो. ही माहितीही आई-वडिलांना ब्राम्हणाने सांगितली असते ते आपणास सांगत असतात यात खरे किती खोटे किती याचा शोध घ्यायचा नसतो.
 
त्यातल्या त्यात देवधर्माची बाब असेल तर विचार करणे सुद्धा पाप.
 
राम अयोध्येत परत आले म्हणून सर्वानी (किमान हिंदूंनी) गुढय़ा उभा करावयास पाहिजे. अयोध्येत गुढय़ा उभा करतात काअरे,अयोध्येतील लोकांना गुढय़ा म्हणजे काय हे सुधा माहित नाही तर उभा करण्याचा प्रश्नाच येत नाही. िहदू धर्मात तांब्या शुभ कोणतातर सवासा-सरळ . त्यात नागवेलीचे पाने लावली आहेत. श्रीफळ वर ठेवले आहे . चारी बाजुने पाच गंधाचे पट्टे ओढले आहेत. या धर्माला सवासा तांब्या शुभ तर गुढी पाडव्याला नववर्षी आपल्या घरावर गुढीला पालथा तांब्या ही शुभ कसाया धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या ही शुभ कसा?
 
शिवाजी महाराजांनी व त्याकाळात गुडी उभारल्याचा कुठे उल्लेख येत नाही! ते कसेकुठे तरी तसा उल्लेख हवा होता कि..शिवशक बंद होऊन पुन्हा महाराष्ट्रात शालिवाहन शक कसा सुरू झाला?
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यारोहानानंतर स्वताच्या नावाचा शक सुरू केला. मग आता आपण याच शकाने चैत्र शु एक ऐवजी जेष्ठ शु 13ला गुढी उभारणे व नवीन वर्ष साजरे करणे अधिक योग्य नाही का ?त्यामुळे मराठी माणसांनी खर तर आता गुढी पाडव्याला शालिवाहन शकाप्रमाणे गुढी पाडव्याला नाव वर्ष साजरे नकरता शिवशकाप्रमाने नवीन वर्ष जेष्ठ शुद्ध 13 ला साजरे करावेया दिवशी गुढी उभारावी तोरणे लावावीत.
 
याहीपुढे बराच मजकूर आहे आणि तो सामाजिक अभिसरणाला बाधा आणणारामुद्दे मांडण्याच्या सुराऐवजी आरोप करण्याच्या सुरातला ठरेलहे उघड आहे. पण शिवराय-भक्त म्हणवणा-यांनी शिव-शकाला मराठी नववर्ष मानण्याऐवजी गुढीपाडव्यालाच मराठी नववर्ष’ का मानावंहा सवाल मात्र अनेकांना पेचात पाडणारा ठरेल. हा ब्लॉग काहीसा प्रचारकी असला तरी त्यातूनही वाचकाला चिंतन-मंथनाकडे जाता येऊ शकतं.
 
असोगुढीपाडव्याला बँक हॉलिडे असतो आणि तो सर्वाचा सण आहे हे ठरलेलं आहे. तेव्हा युगादीच्याचेटीचांदच्या,चैत्रप्रतिपदेपासून सुरू होणा-या नव्या शालिवाहन शकाच्या आणि गुढीपाडव्याच्याही शुभेच्छाच.. नॅकोबातुम्हालाही जाहीर शुभेच्छा!

Tuesday 1 March 2011




इथे कुसुमाग्रज एकटे नाहीत..






चांदण्यांना एक कवी विचारतो, परमेश्वर वगैरे कधी कुठे असतो का? त्यावर चांदण्या कवीला प्रतिप्रश्न करतात, 
उठतात तमावर त्याची पाउलचिन्हे
त्यांनाच पुसशि, तो आहे किंवा नाही?

‘भन्नाट, ग्रेटच’ अशा एकशब्दी ब्लॉग-प्रतिक्रियांची धनीण ठरलेली ही कविता म्हणजे अर्थातच कुसुमाग्रजांची ‘पाऊलचिन्हे’! ती अनेकांना माहीत असेल, कारण आपल्या काही ब्लॉगर-मित्रांनी ती आपापल्या मराठी ब्लॉगवर पोस्ट केली आहेच. पण आपल्या सर्वाच्या ‘ब्लॉगांगणा’त कुसुमाग्रजांची कसकशा प्रकारची पाऊलचिन्हं उमटली आहेत, याचा शोध घेताना निरनिराळे अनुभव आले. ब्लॉगर मंडळी काय फक्त ‘जुन्या छान (व्हिण्टाज!) कवितांचे कन्झ्यूमर’ झाली आहेत का? तसं नसेल, तर‘कणा’ (‘पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’) आणि तिची विडंबनं, नेहमीच्या यशस्वीच कुसुमाग्रज-कविता असंच पुन्हापुन्हा पोस्ट केलेलं का सापडतं? असे प्रश्न सुरुवातीला पडू लागले. पण या प्रश्नांच्या पलीकडे जाणारे, मराठी माणसांचं कवितेवरलं प्रेम निव्वळ कन्झ्यूमरिस्ट नसून ते निर्विवाद आणि अभ्यासूपणातून आलेलं असल्याची ग्वाही देणारे काही ब्लॉग सापडले.

कुसुमाग्रजांचा पुनर्शोध ब्लॉगजगतामधून घेताना kusumagraj.org  ही वेबसाइट उपयोगी पडेल असं वाटलं होतं, पण कुसुमाग्रज-संबंधित काही नवं लिखाण ब्लॉगांवर होतंय का, असल्यास कुठे, याच्या लिंक या ‘डॉट ऑर्ग’ साइटवर नाहीत. तरीही शोध सुरू ठेवला तेव्हा असं लक्षात आलं की, कुसुमाग्रजांना फक्त एक ‘ब्रँडनेम’ न बनवता किंवा त्यांची आंधळी भक्ती (तीही आपण उच्च/ श्रेष्ठ असल्यानं आपल्याला कुसुमाग्रजच आवडणार अशा थाटात) न करता कुसुमाग्रजांच्या कवितेकडे,तिच्या संदर्भाकडे थेट डोळ्यात डोळे घालून पाहणाऱ्या ज्या-ज्या ब्लॉग-नोंदी आहेत, तिथं कुसुमाग्रज या एकटय़ा कवीची चर्चा नाही. अन्य कवी, त्यांच्या कविता यांनाही इथे स्थान आहे.

कुसुमाग्रजांचं मोठेपण मराठीच्या पलीकडे पोहोचलं होतं, त्यामुळे हिंदी ब्लॉगविश्वातही काही प्रमाणात ते आहेत. कुसुमाग्रजांबद्दल आदर अनेक कारणांनी वाटू शकतो, त्यातलं हेही एक कारण.. गूगलवर देवनागरीत ‘कुसुमाग्रज’ असा सर्च दिल्यास कुसुमाग्रजांबद्दलच्या हिंदी लिंकच प्रथम समोर येतात! तिथं कुठेतरी सापडलेला, हिंदी पत्रकार उमेश चतुर्वेदी यांनी ब्लॉगसाठी स्वतंत्रपणे लिहिलेला (बरेच मराठी पत्रकार आपापलं पूर्वप्रकाशित लिखाणच हल्ली ब्लॉगवर डकवतात, तसं नसलेला) मजकूर आधी देण्याचा मोह आवरत नाही.

‘मीडियामीमांसा’ या ब्लॉगवर त्यांनी लिहिलंय : ‘‘मराठी के वरिष्ठ रचनाकर कुसुमाग्रज को ज्ञानपीठ पुरस्कार दिया जा रहा था, तब मंच पर उस जमाने के उप प्रधानमंत्री यशवंत राव बलवंत राव चव्हाण बैठ गए थे। कुसुमाग्रज ने उनके साथ मंच पर बैठने से इनकार कर दिया था। हिंदी में ऐसा साहस दिखाने की हैसियत कितने लेखकों में हैं।’’

तर, कुसुमाग्रजांकडे मराठीजन कितपत अभ्यासूपणे पाहू शकतात, याची प्राथमिक खूण सुरुचि नाईक यांच्या नोट्सवजा नोंदींमधून दिसली. या नोंदी म्हणजे कुसुमाग्रजांच्या काव्यकीर्दीचा समग्र आढावा! नाईक यांचा हा तब्बल चार हजारहून अधिक (कवितांच्या अवतरणांसह) लेख ‘थेटभेट’ या ब्लॉगवर चार भागांत वाचता येईल.

‘‘कुसुमाग्रजांनी अनेक प्रकारचे काव्य लेखन केले. त्यात सामजिक, प्रेमकविता, निसर्ग कविता, तात्विक कविता,स्थळ्वर्णनात्मक कविता, व्यक्ति वर्णनात्मक कविता आिदचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या सामजिक कविता ह्या केशवसुतांच्या सामाजिक कविताशी जवळिक असलेल्या वाटतात. त्यातल्या त्यात, केशवसुतांच्या ‘नवा शिपाई’, ‘मजुरावर उपासमारिची पाळी’ यांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’, ‘बली’ या कुसुमाग्रजांच्या कविता वाचताना आठवण येते. सावरकरांच्या कवितेतील समर्पण, कळकळ ही कुसुमाग्रजांच्या कवितांमधून जाणवते. कुसुमाग्रजांच्या काही कवितांचा तुलनात्मक अभ्यास करताना सावरकरांच्या ‘आत्मबल’, ‘आकांक्षा’ या कविता कुसुमाग्रजांच्या ‘अहि-नकुल’, ‘मी जिंकलो’ या कविताशी साधर्म्य साधणा-या वाटतात.’’

इतका प्रांजळपणे घेतलेला आढावा काहीसा पुस्तकी वाटेल. त्याउलट, कुसुमाग्रजांच्या जरा अपरिचित म्हणाव्या अशा सर्वात मधुर स्वर कुठेतरी, कोणाच्यातरी मनगटातील  शृंखला खळखळा तुटण्याचा आदी ओळी असलेल्या एका कवितेचा उल्लेख करून ‘‘स्वातंत्र्यासाठी हजारांच्या आकडय़ातील क्रांतिकारकांच्या हाता-पायातील साखळदंड तुटल्यावर कुसुमाग्रजांना हे असेच वाटले असेल का?’’ अशी काहीशी भावुक दाद देणाऱ्या चिन्मय दातारसारख्यांचंही कौतुक वाटेल.

पण स्वानुभव आणि स्वत:चं ज्ञान यांची सांगड घालणारी बुद्धिगम्य मांडणी अर्चनानं ब्लॉगवर केली आहे. फक्त ‘अर्चना’एवढय़ाच नावाने लिहिणारी ही कुणी एक.. संस्कृतची विद्यार्थिनी- अभ्यासकच. तिनं फार सुंदर लिहिलंय कुसुमाग्रज आणि शांताबाईंनी केलेल्या ‘कालिदासकृत मेघदूतम्’च्या मराठी काव्यानुवादाबद्दल! ते मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

‘‘मेघदूताचे सर्वच मराठी अनुवाद वैविध्यपूर्ण आहेत. सी. डी. देशमुखांचा अनुवाद समछंदी आहे तर वसंत बापटांचा मुक्तछंदात आहे. कुसुमाग्रजांचा अनुवाद 1956 सालचा आहे तर शांताबाईंचा अनुवाद 1994 चा. .. माझ्या मते हे दोघेही अनुवाद आपापल्या जागी अत्यंत सुंदर आहेत; कारण त्यांच्या अनुवादकांनी ठरवल्याप्रमाणेच ते अनुवाद उतरले आहेत. त्या ध्येयांनुसार त्यांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. शांताबाईंचा अनुवाद हा संस्कृत किंवा प्राचीन भारतीय समाजाच्या अभ्यासकांसाठी मूळ मेघदूत वाचण्यापूर्वीची पहिली पायरी आहे, तर कुसुमाग्रजांचा अनुवाद हा काव्यप्रेमींसाठी मेघदूताचा मायबोलीतून आस्वाद घ्यायचे एक साधन आहे.’’
आता शेवटचा किस्सा, कुसुमाग्रजांचा- किंवा कोणत्याही भाषेतल्या कोणत्याही कवीचा- अभ्यास लोकांना सतत करतच राहावा लागतो, याची आठवण देणारा..
नवीन पनवेलला राहणा-या एकनाथ मराठे यांच्या ‘ईजेमराठे’ या ब्लॉगवरल्या एका नोंदीतून हा किस्सा सापडला.

नगरांतिल सदनांतुन लखलखती लाख दिवे..

ही कविता ‘वसंत बापटां’ची असल्याचं एकनाथ मराठे स्वत:च्या वडिलांची आठवण सांगताना म्हणतात, तर धनंजय नानिवडेकर (ध. ना.) यांनी ‘‘माझ्या मते ही कविता कुसुमाग्रजांची आहे. तिचा एकूण घाट तर कुसुमाग्रजी आहेच; शिवाय‘नगरातील लाख दिवे’ ही प्रतिमाही कुसुमाग्रजांनी इतर ठिकाणी अशाच संदर्भात, म्हणजे त्या झगमगाटाचा उथळपणा दाखवायला, वापरली आहे.’’ अशी सुरुवात करून चार भागांची भलीमोठ्ठी प्रतिक्रिया लिहिली आहे. ब-याचदा अशाच खंड-प्रतिक्रिया देणाऱ्या या ध. नां. चा स्वत:चा ब्लॉग वगैरे काहीच सापडत नाही (असल्यास कुणीतरी जरूर कळवा रेऽ). या कवितेच्या वृत्ताबद्दलही बरेच लिहिणा-या नानिवडेकरांना, बापटांनी नंतरही (‘गगन सदन- तेजोमय- तिमिर हरन- करुणाकर’)वापरलेली मात्रांची लय ‘नगरांतिल- सदनांतुन’मध्ये कशी जाणवली नाही, याचं आश्चर्य हे सारं वाचताना वाटतं. कवितेचा शेवटही बापटांच्या कवितेसारख्या नाटय़मय कलाटणीनं आणि अखिल मानवजातीबद्दलच बापटांना वेळोवेळी वाटणा-या कळवळय़ानं होतो, हे ध. ना. यांच्या लक्षात आलं नसेल का?
या प्रश्नावरच आजचा ‘ब्लॉगार्क’ संपणार आहे. त्या सदनांतून लखलखणारे ‘लाख दिवे’ कुणाचे? एकटय़ा कुसुमाग्रजांचे की बापटांचे? हा प्रश्न ब्लॉगजगतात अनुत्तरितच राहिला आहे. मला तरी कुसुमाग्रज एकटे नाहीत आणि कुसुमाग्रजांची जन्मशताब्दी हा मराठी काव्यपरंपरेच्या पुनरावलोकनाचा एक उत्सव आहे असंच वाटतं; त्यामुळे ‘कविता कुणाची?’ या प्रश्नावर ब्लॉगजगतातून काही प्रतिक्रिया याव्यात अशी अपेक्षाही आहे!