Tuesday, 1 March 2011
इथे कुसुमाग्रज एकटे नाहीत..


चांदण्यांना एक कवी विचारतो, परमेश्वर वगैरे कधी कुठे असतो का? त्यावर चांदण्या कवीला प्रतिप्रश्न करतात, 
उठतात तमावर त्याची पाउलचिन्हे
त्यांनाच पुसशि, तो आहे किंवा नाही?

‘भन्नाट, ग्रेटच’ अशा एकशब्दी ब्लॉग-प्रतिक्रियांची धनीण ठरलेली ही कविता म्हणजे अर्थातच कुसुमाग्रजांची ‘पाऊलचिन्हे’! ती अनेकांना माहीत असेल, कारण आपल्या काही ब्लॉगर-मित्रांनी ती आपापल्या मराठी ब्लॉगवर पोस्ट केली आहेच. पण आपल्या सर्वाच्या ‘ब्लॉगांगणा’त कुसुमाग्रजांची कसकशा प्रकारची पाऊलचिन्हं उमटली आहेत, याचा शोध घेताना निरनिराळे अनुभव आले. ब्लॉगर मंडळी काय फक्त ‘जुन्या छान (व्हिण्टाज!) कवितांचे कन्झ्यूमर’ झाली आहेत का? तसं नसेल, तर‘कणा’ (‘पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’) आणि तिची विडंबनं, नेहमीच्या यशस्वीच कुसुमाग्रज-कविता असंच पुन्हापुन्हा पोस्ट केलेलं का सापडतं? असे प्रश्न सुरुवातीला पडू लागले. पण या प्रश्नांच्या पलीकडे जाणारे, मराठी माणसांचं कवितेवरलं प्रेम निव्वळ कन्झ्यूमरिस्ट नसून ते निर्विवाद आणि अभ्यासूपणातून आलेलं असल्याची ग्वाही देणारे काही ब्लॉग सापडले.

कुसुमाग्रजांचा पुनर्शोध ब्लॉगजगतामधून घेताना kusumagraj.org  ही वेबसाइट उपयोगी पडेल असं वाटलं होतं, पण कुसुमाग्रज-संबंधित काही नवं लिखाण ब्लॉगांवर होतंय का, असल्यास कुठे, याच्या लिंक या ‘डॉट ऑर्ग’ साइटवर नाहीत. तरीही शोध सुरू ठेवला तेव्हा असं लक्षात आलं की, कुसुमाग्रजांना फक्त एक ‘ब्रँडनेम’ न बनवता किंवा त्यांची आंधळी भक्ती (तीही आपण उच्च/ श्रेष्ठ असल्यानं आपल्याला कुसुमाग्रजच आवडणार अशा थाटात) न करता कुसुमाग्रजांच्या कवितेकडे,तिच्या संदर्भाकडे थेट डोळ्यात डोळे घालून पाहणाऱ्या ज्या-ज्या ब्लॉग-नोंदी आहेत, तिथं कुसुमाग्रज या एकटय़ा कवीची चर्चा नाही. अन्य कवी, त्यांच्या कविता यांनाही इथे स्थान आहे.

कुसुमाग्रजांचं मोठेपण मराठीच्या पलीकडे पोहोचलं होतं, त्यामुळे हिंदी ब्लॉगविश्वातही काही प्रमाणात ते आहेत. कुसुमाग्रजांबद्दल आदर अनेक कारणांनी वाटू शकतो, त्यातलं हेही एक कारण.. गूगलवर देवनागरीत ‘कुसुमाग्रज’ असा सर्च दिल्यास कुसुमाग्रजांबद्दलच्या हिंदी लिंकच प्रथम समोर येतात! तिथं कुठेतरी सापडलेला, हिंदी पत्रकार उमेश चतुर्वेदी यांनी ब्लॉगसाठी स्वतंत्रपणे लिहिलेला (बरेच मराठी पत्रकार आपापलं पूर्वप्रकाशित लिखाणच हल्ली ब्लॉगवर डकवतात, तसं नसलेला) मजकूर आधी देण्याचा मोह आवरत नाही.

‘मीडियामीमांसा’ या ब्लॉगवर त्यांनी लिहिलंय : ‘‘मराठी के वरिष्ठ रचनाकर कुसुमाग्रज को ज्ञानपीठ पुरस्कार दिया जा रहा था, तब मंच पर उस जमाने के उप प्रधानमंत्री यशवंत राव बलवंत राव चव्हाण बैठ गए थे। कुसुमाग्रज ने उनके साथ मंच पर बैठने से इनकार कर दिया था। हिंदी में ऐसा साहस दिखाने की हैसियत कितने लेखकों में हैं।’’

तर, कुसुमाग्रजांकडे मराठीजन कितपत अभ्यासूपणे पाहू शकतात, याची प्राथमिक खूण सुरुचि नाईक यांच्या नोट्सवजा नोंदींमधून दिसली. या नोंदी म्हणजे कुसुमाग्रजांच्या काव्यकीर्दीचा समग्र आढावा! नाईक यांचा हा तब्बल चार हजारहून अधिक (कवितांच्या अवतरणांसह) लेख ‘थेटभेट’ या ब्लॉगवर चार भागांत वाचता येईल.

‘‘कुसुमाग्रजांनी अनेक प्रकारचे काव्य लेखन केले. त्यात सामजिक, प्रेमकविता, निसर्ग कविता, तात्विक कविता,स्थळ्वर्णनात्मक कविता, व्यक्ति वर्णनात्मक कविता आिदचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या सामजिक कविता ह्या केशवसुतांच्या सामाजिक कविताशी जवळिक असलेल्या वाटतात. त्यातल्या त्यात, केशवसुतांच्या ‘नवा शिपाई’, ‘मजुरावर उपासमारिची पाळी’ यांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’, ‘बली’ या कुसुमाग्रजांच्या कविता वाचताना आठवण येते. सावरकरांच्या कवितेतील समर्पण, कळकळ ही कुसुमाग्रजांच्या कवितांमधून जाणवते. कुसुमाग्रजांच्या काही कवितांचा तुलनात्मक अभ्यास करताना सावरकरांच्या ‘आत्मबल’, ‘आकांक्षा’ या कविता कुसुमाग्रजांच्या ‘अहि-नकुल’, ‘मी जिंकलो’ या कविताशी साधर्म्य साधणा-या वाटतात.’’

इतका प्रांजळपणे घेतलेला आढावा काहीसा पुस्तकी वाटेल. त्याउलट, कुसुमाग्रजांच्या जरा अपरिचित म्हणाव्या अशा सर्वात मधुर स्वर कुठेतरी, कोणाच्यातरी मनगटातील  शृंखला खळखळा तुटण्याचा आदी ओळी असलेल्या एका कवितेचा उल्लेख करून ‘‘स्वातंत्र्यासाठी हजारांच्या आकडय़ातील क्रांतिकारकांच्या हाता-पायातील साखळदंड तुटल्यावर कुसुमाग्रजांना हे असेच वाटले असेल का?’’ अशी काहीशी भावुक दाद देणाऱ्या चिन्मय दातारसारख्यांचंही कौतुक वाटेल.

पण स्वानुभव आणि स्वत:चं ज्ञान यांची सांगड घालणारी बुद्धिगम्य मांडणी अर्चनानं ब्लॉगवर केली आहे. फक्त ‘अर्चना’एवढय़ाच नावाने लिहिणारी ही कुणी एक.. संस्कृतची विद्यार्थिनी- अभ्यासकच. तिनं फार सुंदर लिहिलंय कुसुमाग्रज आणि शांताबाईंनी केलेल्या ‘कालिदासकृत मेघदूतम्’च्या मराठी काव्यानुवादाबद्दल! ते मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

‘‘मेघदूताचे सर्वच मराठी अनुवाद वैविध्यपूर्ण आहेत. सी. डी. देशमुखांचा अनुवाद समछंदी आहे तर वसंत बापटांचा मुक्तछंदात आहे. कुसुमाग्रजांचा अनुवाद 1956 सालचा आहे तर शांताबाईंचा अनुवाद 1994 चा. .. माझ्या मते हे दोघेही अनुवाद आपापल्या जागी अत्यंत सुंदर आहेत; कारण त्यांच्या अनुवादकांनी ठरवल्याप्रमाणेच ते अनुवाद उतरले आहेत. त्या ध्येयांनुसार त्यांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. शांताबाईंचा अनुवाद हा संस्कृत किंवा प्राचीन भारतीय समाजाच्या अभ्यासकांसाठी मूळ मेघदूत वाचण्यापूर्वीची पहिली पायरी आहे, तर कुसुमाग्रजांचा अनुवाद हा काव्यप्रेमींसाठी मेघदूताचा मायबोलीतून आस्वाद घ्यायचे एक साधन आहे.’’
आता शेवटचा किस्सा, कुसुमाग्रजांचा- किंवा कोणत्याही भाषेतल्या कोणत्याही कवीचा- अभ्यास लोकांना सतत करतच राहावा लागतो, याची आठवण देणारा..
नवीन पनवेलला राहणा-या एकनाथ मराठे यांच्या ‘ईजेमराठे’ या ब्लॉगवरल्या एका नोंदीतून हा किस्सा सापडला.

नगरांतिल सदनांतुन लखलखती लाख दिवे..

ही कविता ‘वसंत बापटां’ची असल्याचं एकनाथ मराठे स्वत:च्या वडिलांची आठवण सांगताना म्हणतात, तर धनंजय नानिवडेकर (ध. ना.) यांनी ‘‘माझ्या मते ही कविता कुसुमाग्रजांची आहे. तिचा एकूण घाट तर कुसुमाग्रजी आहेच; शिवाय‘नगरातील लाख दिवे’ ही प्रतिमाही कुसुमाग्रजांनी इतर ठिकाणी अशाच संदर्भात, म्हणजे त्या झगमगाटाचा उथळपणा दाखवायला, वापरली आहे.’’ अशी सुरुवात करून चार भागांची भलीमोठ्ठी प्रतिक्रिया लिहिली आहे. ब-याचदा अशाच खंड-प्रतिक्रिया देणाऱ्या या ध. नां. चा स्वत:चा ब्लॉग वगैरे काहीच सापडत नाही (असल्यास कुणीतरी जरूर कळवा रेऽ). या कवितेच्या वृत्ताबद्दलही बरेच लिहिणा-या नानिवडेकरांना, बापटांनी नंतरही (‘गगन सदन- तेजोमय- तिमिर हरन- करुणाकर’)वापरलेली मात्रांची लय ‘नगरांतिल- सदनांतुन’मध्ये कशी जाणवली नाही, याचं आश्चर्य हे सारं वाचताना वाटतं. कवितेचा शेवटही बापटांच्या कवितेसारख्या नाटय़मय कलाटणीनं आणि अखिल मानवजातीबद्दलच बापटांना वेळोवेळी वाटणा-या कळवळय़ानं होतो, हे ध. ना. यांच्या लक्षात आलं नसेल का?
या प्रश्नावरच आजचा ‘ब्लॉगार्क’ संपणार आहे. त्या सदनांतून लखलखणारे ‘लाख दिवे’ कुणाचे? एकटय़ा कुसुमाग्रजांचे की बापटांचे? हा प्रश्न ब्लॉगजगतात अनुत्तरितच राहिला आहे. मला तरी कुसुमाग्रज एकटे नाहीत आणि कुसुमाग्रजांची जन्मशताब्दी हा मराठी काव्यपरंपरेच्या पुनरावलोकनाचा एक उत्सव आहे असंच वाटतं; त्यामुळे ‘कविता कुणाची?’ या प्रश्नावर ब्लॉगजगतातून काही प्रतिक्रिया याव्यात अशी अपेक्षाही आहे!