Friday, 3 June 2011

पालकनीतीचा आत्मप्रत्यय


समीक्षा नेटके


पालकत्व आणि ब्लॉगिंग यांच्यात काहीतरी साम्य आहे!


ज्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीतल्या मराठीभाषकांकडे मराठीतून ब्लॉग लिहिण्याइतकी ऊर्मी असते,त्यापैकी बहुतेकांना मिळेल ते मराठी वाचण्यातही रस असणारच, असं गृहीत धरूया. ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर गेल्या 20 वर्षात नियतकालिकं, दैनिकं यांनी इतक्यांदा काही ना काही छापलंय की, हे काही ना काही वाचलेले ब्लॉगरही बरेच असणार. तरीही पालकत्वाच्या अनुभव-कथनाचा भाग अनेक मराठी ब्लॉगांवर ब-याचदा आलेला आहे. असं कसं काय? या ब्लॉगरांनी चांगलं लिहिलंय, हे आपण पाहूच, पण लिखाणात घिसेपिटे विषय टाळावेत, याची जाण असलेल्यांना ‘पालकत्वाची जाण’ या फार वेळा लिहून झालेल्या विषयावर पुन्हा का लिहावंसं वाटतं?

वाटणारच, याला एक मजेदार कारण आहे : पालकत्व आणि ब्लॉगिंग यांच्यात काहीतरी साम्य आहे!

पालकत्वाचे अनुभव किंवा उपदेश वाचून कोणी पालक होत नाही, तसं इतरांचे ब्लॉग खूप वाचले आहेत म्हणून कोणी ब्लॉगर होत नाही. पालकत्वाची जाण स्वत:च्या घरातच येते, जसं ब्लॉगिंगही स्वत:च्या ब्लॉगवरनंच सुरू होतं. हे दोन्ही प्रकार ‘स्वान्त’ असतात की नसतात हे लोकांना ठरवूंदे; पण ते ‘स्वारंभ’ असतात हे मात्र नक्की. आपली मुलं हे आपलं‘एक्स्टेन्शन’ आहेत, ही जाणीव तर माणूस या प्रजातीत जैव-मानसिकच म्हणावी लागेल. पण आपला ब्लॉग हाही आपलं एक्स्टेन्शच मानला जातो की.. त्याला ‘जैव-मानसिकता’ सारखा कुठला शब्द वापरणारोत आपण? ई-मानसिकता?

बारावीचा निकाल नुकता लागलाय, शाळाही सुरू होणार आहेत, सुट्टीत कुठेकुठे जाऊन मंडळी परतू लागलीत आणि पुढल्या आठवडय़ाभरात शाळेसाठीच्या खरेदीची धावपळ सुरू होणार आहे. याबद्दल ब्लॉगजगतात कायकाय सापडतं, असं लिहायचं मनात होतं. पण खरेदीची वा सुट्टीची ती वर्णनं, भाच्या-पुतण्यांच्या निकालानंतर स्वत:च्या निकालाच्या वेळच्या आठवणी,यापेक्षा निराळंच काहीतरी सापडू लागलं! हे जे सापडलेलं आहे ते थेट, पालकत्वाची जाण अनेक पालकांमध्ये कशी समृद्ध होते आहे, हेच सांगणारं होतं. म्हणून मग आजचा ‘ब्लॉगार्क’ सरत्या सुट्टीपुरता न राहता, तो जरा जनरल झालाय.. पालकत्व हा विषय नव्हे, पण ती जाण ब्लॉग-लिखाणातून कशी वाढतेय हे इथं दिसेल.

नोंदवणं, लिहिणं - आपलं लिखाण लोक वाचू शकणार आहेत याचं भान असणं, यातून एक निराळीच प्रक्रिया सुरू होते. बेडरूममध्ये, अगदी बेडवर लॅपटॉप ठेवून तुम्ही लिहित असलात तरी एकदम शंभरजणांपुढे बोलू लागला आहात, असा आवाज तुमच्या शब्दांना येत असतो. पत्रलिखाणासारखी जवळीक- इंटिमसी जरी ब्लॉगलिखाणात कुणी साधली असेल, तरीही हे पत्र खासगी न राहता पुस्तकरूपी पत्रसंग्रहातल्यासारखं आपल्या ब्लॉगवरून कोणीही वाचणार आहे, याचं भान असतंच. खासगी आणि सार्वजनिक जीवनाची अशी सरमिसळ डिजिटल जमान्यात होतच असते. त्यामुळे ‘कथापौर्णिमा’ या ब्लॉगच्या कर्त्यां पूनम छत्रे http://kathapournima.blogspot.com/2011/05/blog-post.html  यांना स्वत:च्या डोळ्यात पाणी आल्यावर रिअ‍ॅलिटी शो आठवतात.. ‘‘मला अचानक टीव्हीत दिसणारे ते सो कॉल्ड रिअ‍ॅलिटी शोज आठवले. विशेषत: लहान मुलांचे शो! मुला/मुलीचं कौतुक केलं की आईवर क्लोजप. ती माता बिचारी रडत असणार. मग तिला बोलतं करणार. ती म्हणणार- याला बघून खूप अभिमान वाटतोय, माझं स्वप्न आज याने पूर्ण केलं! आपण मान डोलावणार. आणि चॅनलचा टीआरपी वाढवणार. पण काल तलावावर कॅमे-याने कोणी शूट करत असतं ना, तर माझ्यावरचा कॅमेरा त्यांनी हटवला नसता. माझा मुलगा तोडकं मोडकं का होईना पोहतोय हे बघून मी चक्क माझ्याही नकळत घळाघळा रडायला लागले होते!!
 म्हणूनच जेव्हा आज माझा मुलगा पोहतो, त्या जागी मी स्वत:ला पाहते. त्याच्या चेह-यावरचा आनंद माझा असतो. खरंतर उन्हाळ्यात प्रत्येक तलाव मुलांनी भरलेला असतो. सगळेच पोहायला शिकतात. ऑफिसच्या वेळा सांभाळत आम्हाला त्याला फक्त हा एकच क्लास लावता येतो, हाही एक योगायोगच. त्या हजारो मुलात माझाही एक आहे, हा आनंद, हे समाधान माझ्यासाठी वेगळंच आहे. नो वन्डर, त्याला पोहोताना पाहिलं, की माझीही ‘रिअ‍ॅलिटी मम्मी’ होऊन जाते!’’

पुढे पूनम यांनी ‘माझ्या पालकांनी माझं नाव शिकाऊ पोहोणा-यांच्या यादीत कधीच का नाही घातलं ’ अशी खंत ब्लॉगावली आहे. पण वाचक म्हणून आपल्याला आठवेल तो ‘रिअ‍ॅलिटी मम्मी’ हा शब्दप्रयोगच!
 ‘‘लहान होता तेव्हा माझ्या हाताला घट्ट पकडून चालायचा. आता माझ्या बाळाचा हात माझ्या हातापेक्षा मोठा झालाय. कसे समजावून सांगू? प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण हवे असते. मीही समजावून सांगत असते पण आई जगापेक्षा लहान आहे. त्यालाच अनुभव घ्यावा लागणार आहे. मी कुठपर्यंत पोहोचणार?’’

असं एक वाक्य ‘अनुक्षरे’ http://anukshre.wordpress.com/2010/01/06/ या ब्लॉगवर सापडलं आणि ‘आई जगापेक्षा लहान असते का?’ या प्रश्नाची भिंतच समोर उभी राहिली. या ब्लॉगच्या लेखिकेनं दूर राहून शिकणा-या, तिथं घरावेगळेपणामुळे अंगभूत शहाणपणानं वागणा-या, तरीही आसपासच्या मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्यावर आईचाच आधार शोधणा-या मुलाबद्दल लिहिलं आहे.

या दोन आई, आजच्या प्रातिनिधिक आहेत का? बाबा मंडळी काय करताहेत, ब्लॉगवरली?

‘तारे जमीं पर’ आणि ‘चक दे’ सिनेमांवर लिहिता-लिहिता आपण स्वत: बापाच्या भूमिकेतून कसे वागणार, याचं मर्मग्राही टिपण करणारे विशाल गाढवे यांनी ‘काही मनातलं’ या ब्लॉगवर फार काही लिहिलेलं नाही. पण ब्लॉगवरल्या अगदी मोजक्या नोंदींपैकी एकीत ते म्हणतात,

‘‘ जर मी ईशान्तच्या वडिलांच्या जागी असतो तर मी काय केले असते? आय वॉज शॉक्ड.. मी देखील मिस्टर अवस्थी- ईशान्तच्या वडिलांप्रमाणेच रिअ‍ॅक्ट झालो असतो. इनफॅक्ट, आपण तसेच रिअ‍ॅक्ट होतो. परीक्षेत चांगले मार्क मिळत असतील तरच मुलगा हुशार. अन्यथा ढ.. हे असं का? परीक्षा, अभ्यास, मार्क म्हणजेच सर्व काही का? मुलांचा आनंद महत्त्वाचा नसतो?’’

विशाल गाढवे http://vishalgadhave.blogspot.com/2008/01/blog-post_24.html यांचा ब्लॉग-ओळखीतला फोटो (तोही 2008 चा) पाहिल्यास, यांना पालकत्वाचा अनुभव असेलच याची खात्री नाही देता येत, पण पालकत्वाची जाण स्वत:पासून सुरू होते, हे अधिक खरं.. त्यासाठी मूल आत्ताच असलंच पाहिजे, अशी अट कुठेय?

अभिलाष मेहेंदळे http://hitgooj.blogspot.com/2010/08/blog-post.html  हे ‘शिक्षणाशी संबंधित व्यवसायाशी निगडित’आहेत.. (पुणेरी विषयांतर : त्यांनी ‘निगडीत’ लिहिलंय, पण प्राधिकरणात की गावात हे सांगितलं नाही) म्हणून त्यांना पालकत्वाबद्दल थिऑरेटिकली बरंच बोलता येणार, अशी कल्पना आपण करू शकतो. ‘मोठेपण दे गा देवा’ या ब्लॉग-नोंदीतला त्यांचा सूर काहीसा कोरडेपणानं थिअरी सांगण्याचा- जरा पुरुषीच आहे, पण त्यातली भावना खरी आहे आणि मुख्य म्हणजे, पालकत्वाची जाण ‘नकळत’ समृद्ध होणंच महत्त्वाचं असतं हे मान्य असल्यास, अशी नकळत समृद्धी त्यांच्या या नोंदीत आहे..

‘‘साधारणत: पाच ते 15 वर्ष वयोगटातील मुलांची सहसा अशीच कुचंबणा असते. पाचव्या-सहाव्या वर्षानंतर मुलांना थोडं थोडं कळायला लागतं. पण त्याचवेळी ते ‘क्यूट’ या फेसमधुन बाहेर पडू लागत असल्याने त्यांचं कोडकौतुक कमी व्हायला लागतं आणि त्यांच्यावर दमदाटी, त्यांना लहानसहान कामं सांगणं इत्यादी सुरु होतं. ‘लहान आहेस तो पर्यंत मजा करून घे, पुढचं आयुष्य म्हणजे रौरव नरक’, असंही त्यांना ऐकवलं जातं, पण हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नसणं, या एकमेव पण अत्यावश्यक बंदीमुळे त्याला विशेष अर्थ राहत नाही.

पालक चुकीचं वागतात असं मला सूचित करायचं नाहिये. पण जेव्हा जेव्हा मी ऐकतो की लहानपणी मजा असते, मोठेपणी सगळं नाहीसं होतं, हे मला तरी मान्य नाही. मी लहान असताना इतरांप्रमाणे रात्री कितीवेळ बाहेर राहाणे, किती आणि कोणते सिनेमे बघणे, महिन्यात कितीवेळा हॉटेलात मित्रांबरोबर खाणे, किती वेळ टि.व्ही. बघणे इ. ला मर्यादा होत्या. अर्थात त्या आवश्यक होत्या. आता मी विवाहीत आहे. मला सहा महिन्यांची मुलगी आहे, त्यामुळे अर्थातच जबाबदा-या आणि ताण आहेत, पण निर्बंध नाहीत. अर्थात मी अव्याभिचारी अनिर्बंधांबद्दल बोलत नाहिये. पण मी कधीतरी उशीरापर्यंत टि.व्ही. बघितला किंवा उगीचच एखादी वस्तू विकत घेतली, तर मला कुणी दमदाटी करणार नाही किंवा जाब विचारणार नाही. ही स्वातंत्र्याची भावना आपण किती सहजतेने दुर्लक्षितो? बहुधा या भावनेसाठीच लहान मुलांना लवकरात लवकर मोठे व्हावेसे वाटते.’’
 लवकर मोठं व्हावंसं वाटतं म्हणजे काय, याच्या किस्सेवजा नोंदी पाहूच कधीतरी.. पण आजचा ब्लॉगार्क स्वारंभ पालकनीतीच्या आत्मप्रत्ययापुरताच मर्यादित ठेवलेला बरा!