Sunday, 15 May 2011

शैली आणि माहिती, मतं आणि आच!


समीक्षा नेटके हे नाव आता ब-याच मराठी ब्लॉगरांच्या ब्लॉगांवर, ‘फॉलोअर्स’ म्हणजे ‘सदस्यां’च्या यादीत तुम्हाला पाहायला मिळेल. सदस्यता नसलेले ब्लॉग अर्थातच, या सदराच्या निमित्तानं वाचले जातात. मात्र, ब्लॉगचं वाचक-सदस्य झाल्यावर त्या ब्लॉगशी जोडलं गेल्यासारखं वाटतं, असा अनुभव अनेकांचा असेल. मग त्यापैकी एखादा ब्लॉग शैलीसाठी, दुसरा माहितीमुळे तर तिसरा मतांकरता लक्षात राहतोय,असंही होत असेल. असे तीन नमुने (‘आदर्श’ नको, नमुनेच बरे!) ठरणा-या तिघांचे ब्लॉग अगदी गेल्या चार दिवसांतच नव्यानं ‘अपडेट’ झालेले दिसले. व्यक्तिमत्त्व ब्लॉगमध्ये कसं उतरतं, याचा वस्तुपाठ आहेत हे तिघे! तसे आणखीही ब्लॉगर असणारच, कारण व्यक्तिमत्त्व ब्लॉगमध्ये उतरत नाही असं दिसलं की तो ब्लॉग जणू, लेखकाचा राहातच नाही आणि म्हणून- अशाच कारणासाठी अनेकांचं ब्लॉगलेखन थांबतं, थांबलंय. इथं खरंच कुणाचा उल्लेख आणि कुणाचा अनुल्लेख असं काही करायचं नाहिये.. ब्लॉगर.कॉमवरून सदस्यता घेतलेल्या 51 पैकी हे तीन ब्लॉग, म्हणजे उणेपुरे सहा टक्के! तरीही हे‘सँपल’ यथास्थित आहे, असं वाटलं आणि मुख्य म्हणजे या तिन्ही नोंदी वाचनीयच वाटतील, तुम्हालाही.

अभिजीत पुण्याचा आहे, हे त्याच्या ब्लॉग-नोंदींतल्या काही सांस्कृतिक आग्रहांवरूनही लक्षात येतं. ‘डीएसएलआर कॅमेरे- काही गैरसमज’ या ब-याच आधीच्या नोंदीचं नाव वाचून, ‘इथं अभिजीतची खुसखुशीत मतं नसतील, नुसती माहिती असेल,’ म्हणून वाचायला घेतलं तर इथंही (गं)मत आहेच! ‘डीएसएलआर कॅमेरा माझ्यासाठी आहे’ हा गैरसमज क्रमांक चार- आणि अखेरचा- अभिजीतनं ज्या तिखटपणे खोडलाय, त्यात त्याचे ‘सांस्कृतिक आग्रह’ दिसतील आणि ते आग्रह सुसंस्कृतदेखील आहेत, हे कळेल. अभिजीतची ताजी नोंद ‘फॉरवर्ड’ म्हणून पाठवावी असा मोह होण्यातली आहे (सांभाळा अभिजीतपंत.. हवं तर कॉपीगार्ड लावून घ्या!) ‘प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न’ या नोंदीची सुरुवातच, ‘‘एवढय़ा मोठमोठय़ा जाहिराती दाखवायला या टेलिमॉल नि स्कायशॉपवाल्यांकडे पैसा येतो कुठून? म्हणजे लोक खरंच त्यांच्या वस्तू खरेदी करतात? नजर रक्षा कवच आणि इंग्लिश गुरू ‘पैसे देऊन’ विकत घेणारे लोक या जगात आहेत?

स्वत:चं पुन्हा पुन्हा कौतुक करताना आपण किती हास्यास्पद दिसतो हे सचिन पिळगावकर साहेबांना कधी कळणार?’’

अशी आहे आणि शेवट,

‘‘पुण्याच्या वाहतुकीची दिवसेंदिवस अवघड होत जाणारी स्थिती पहाता काही वर्षानी ‘आम्ही स्वारगेटवरून शिवाजीनगरला एका तासात पोहोचत असू’ असं एखादे आजोबा आपल्या नातवाला सांगतील का?
 आयपीएल स्पर्धा जर वर्षातून तीनदा भरवली तर सध्याच्या तीनपट पैसे गोळा करता येतील हे आयपील आयोजकांच्या अजून लक्षात कसे आले नाही?’’
असो! संकीर्ण मतं आहेत ही, त्यामुळे या नोंदीच्या मजकुरात ओघ, सातत्य काही नाही. थोडी आयटमगिरी. एकेक वाक्यं.‘फॉरवर्ड’साठी उत्तम फॉर्म.

याउलटआनंद घारे  हे तारापूर अणुऊर्जा केंद्रातून निवृत्त झालेले, अणुभौतिकीचा अभ्यास आणि कुतूहल कायम ठेवणारे काका. त्यांनी याच आठवडय़ात ‘अणुऊर्जेपासून विजेची निर्मिती- भाग दोन’ ही नोंद प्रकाशित केलीय. घारे यांचा अभ्यास दांडगा, अधिकार मोठा आहे, हे त्यांचा ‘आनंदघन’ नावाचा ब्लॉग वाचताना जाणवतंच. घारे यांच्याकडे संशोधकी वा शास्त्रीय वृत्तीमुळे आलेला खुलेपणाही आहे.. उदाहरणार्थ, दोनेक महिन्यांपूर्वी ‘मोलेक्युल’ आणि ‘अ‍ॅटम’ला ‘अणू आणि परमाणू’ म्हणणा-या घारे यांनी 13 एप्रिलच्या नोंदीत लिहिलंय की, हे मराठी प्रतिशब्द चुकीचे असल्याचे मला या लेखांवरील चर्चेतून जाणवले. त्याऐवजी, सध्या जे अणु आणि रेणू हे शब्द आता प्रमाणभाषेत दिले जातात असे समजल्यामुळे मीही त्याच शब्दांचा वापर करेन! फुकुशिमा आणि जैतापूर हे राजकीय चर्चेचे विषय ठरल्यानंतर अनेकांनी अणुऊर्जाच ‘व्हिलन’ असल्याप्रमाणे बोलायला सुरुवात केली, अशा वेळी घारे यांनी हे लिखाण केली आहे. आधीचे तीन लेख झाल्यावर त्यांना कुणी ‘याचं पुस्तक चांगलं होईल’ हे सांगितलं की नाही माहीत नाही; पण मे महिन्यात त्यांनी अणुऊर्जा- वीजनिर्मिती यांचा इतिहास मांडणारं लिखाण सुरू केलं आहे. इतिहास लोकांना आवडायला हवा म्हणून घारे काही ‘अणुशाहीर’ नाहीत झालेले.. वैज्ञानिक काटेकोरपणा त्यांनी सोडलेला नाही, तरीही लोकांना समजेलशी उदाहरणं ते देतात. अणुभट्टीची ‘क्रिटिकॅलिटी’ म्हणजे काय, हे त्यांनी खूप सोपं करून सांगितलंय..

‘‘रिअ‍ॅक्टरमधले कॅड्मियम रॉड अनेक न्यूट्रॉन्सना गिळंकृत करत असल्यामुळे सुरुवातीला फिशन चेन रिअ‍ॅक्शन टिकत नव्हती. हे रॉड हळूहळू वर नेत गेल्यानंतर त्यांचा प्रभाव कमी होत गेला आणि असा क्षण आला की ही भंजनांची साखळी पुढे आपल्या आप चालत राहिली. याला ’क्रिटिकॅलिटी’ असे म्हणतात! त्यानंतर कॅड्मियम रॉड आणखी वर उचलले असते तर रिअ‍ॅक्टर ’सुपरक्रिटिकल’ झाला असता म्हणजे भंजनांची संख्या वेगाने वाढत गेली असती आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या ऊष्णतेची तीव्रता वाढत गेली असती. कॅड्मियम रॉड खाली सोडले असते तर रिअ‍ॅक्टर ’सबक्रिटिकल’ झाला असता म्हणजे भंजनांची संख्या वेगाने कमी होत जाऊन ती थांबली असती. या पहिल्या यशस्वी प्रयोगाला आता साठ वष्रे होत आली असली तरी आजसुद्धा जगातला प्रत्येक रिअ‍ॅक्टर अशाच प्रकारे सुरू केला जातो. आता हे कंट्रोल रॉड्स हाताने ओढत नाहीत, त्यासाठी यांत्रिक व्यवस्था असते एवढाच बदल त्यात झाला आहे. ’’

.. आणि आता तिसरी नोंद.. माहिती, संशोधकवृत्ती, मतं हे सगळं आणि त्याहीपेक्षा जाणीव आणि आच ज्यांच्या लिखाणात नेहमीच दिसते, त्या ‘इंद्रधनू’ मैत्रिणींच्या ब्लॉगवरली..त्यापैकी ‘भारतीय स्त्रीचं गृहिणीकरण- 1’ या नावाची ही नोंद विद्या कुळकर्णी यांनी लिहिलीय.

ती वाचून आज थांबूया.. विचारही करूया..

‘‘इंग्रजांनी जर आमच्यावर सत्ता गाजवायला नको असेल तर आपण आधी आपल्या स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे असं नवशिक्षितांना आणि सुधारकांना वाटायला लागलं.

मग व्हिक्टोरियन इंग्रजी गृहिणी ही प्रमाण मानून इथल्या स्त्रीचं गृहिणीकरण सुरू झालं.

पहिल्यांदा हे बंगालमधे झालं आणि नंतर हे महाराष्ट्रात सुरू झालं.

स्त्रियांनी शिकलं पाहिजे, सुधारलं पाहिजे असं ठरवलं गेलं.

स्त्रीचं काम काय? तर मुले सांभाळणं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, शिवण- टिपण करून घर व्यवस्थित ठेवणं वगरे वगरे.

स्त्रीने शिकायचं का? तर मुलांना शिक्षित आई मिळावी म्हणून. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून. तिने यासाठी गणित, शास्त्र हे शिकण्याची गरज नाही, तिने गृहविज्ञान शिकावं.

तिने वावरायचं कसं, बोलायचं कसं हे ही ठरवलं जावू लागलं.

आपण का शिकायचं? शिक्षण म्हणजे काय बरं? आपण का शिकलोय?..’’

Thursday, 5 May 2011

ससाबांचं ब्लॉगारोहण


‘ससाबा’ हे लघुनाम सत्यसाईबाबांसाठी ‘उपक्रम’मधल्या ‘डार्क मॅटर’नामक चर्चाकारानं 6 एप्रिलच्या चर्चेत वापरलं. विचारी निर्णयशीलपणा आणि स्थितीवादीपणा यांचं जे काही वाग्युद्ध ‘उपक्रम’ वर सुरू असतं, त्याला साजेशीच ही चर्चा आहे. सेलेब्रिटी आणि बाबा - ससाबाच नव्हे, कोणतेही बाबा, यांच्या नात्याबद्दलची मतं फक्त स्थितीवादी नाहीत, असा विश्वास या चर्चेतून सध्यातरी मिळतो आहे

‘‘गेले एकदाचे हे बाबा.. खूप दुख झाले असेल ना सचिन.. अरे सचिन तुझ्या जितक्या धावा आहेत ना तितकी कुपोषित बालके रोज मेली.. तितक्याच मुली आईच्या गर्भात मारल्या गेल्या, तितक्याच शेतक-यांनी आत्महत्या केल्या.. ना त्या पुत्तापार्थीला कंठ फुटला ना तुला ना त्या तुझा षटकार पाहून कंठ फुटणा-या लताबाई मंगेशकरांना ..’’ अशा शब्दांतलं लिखाण भावनिकच वाटणार, विचारी वाटणार नाही, हे उघड आहे. लिखाणाची धार वाढण्यासाठी, शब्द अधिक बोचरे होण्यासाठी भावनेचा भर आवश्यक आहे, हेही मान्य. पण रूढार्थानं ब्लॉग-सभ्यतेचे संकेत न पाळणारं हे लिखाण मी माझ्या ब्लॉगवर ठेवेन, कारण लोकांनी ते वाचलंच पाहिजे हा वैभव गायकवाडचा निश्चयीपणा पाहून मात्र, संकेत वगैरे बाजूला ठेवून दाद देण्याजोगा आहे. (http://www.vaibhavgaikwad.com/2011/04/blog-post_24.html)

हा वैभव गायकवाड जो ब्लॉग चालवतो, तिथं अन्य ब्लॉगांवर छापून आलेले लेखच लिंकसकट असतात. सचिनवरल्या लेखाची लिंक मात्र नाही. ‘ब्लॉगार्क’ सजग असल्यानं दररोज अनेक ब्लॉग पाहिले जातात, त्यावेळी हे लिखाण मात्र फक्त वैभवच्याच ब्लॉगवर सापडलंय. तरीही वैभवनं कॉमेंटमध्ये दावा केलाय की सचिनला हे अनावृत पत्र त्यानं लिहिलेलं नाही. ‘‘गुगलवर सचिन आणि सत्यसाईबाबा सर्च करता-करता मिळाला. मी तिकडून उचलून परत माझ्या ब्लॉगवर पोस्ट केला. सुरुवातीला लिंक टाकली होती, पण मी आर्टकिल पोस्ट करेपर्यंत मूळ आर्टकिल काढून टाकलं गेलं. त्यांना बहुतेक शिव्यांचा मार झेपला नसावा. मला काही फरक पडत नाही कुणाच्याही भुंकण्याने. मी तसंच ठेवलं आर्टकिल.

कुणाचे श्रेय लाटण्याचा हेतू नाही. एरवी मी कायम लिंक्स देत आलोय. पण या आर्टकिल संदर्भात मी लिंक न केलेले चांगले. त्यांना पडणा-या शिव्या माझ्या अंगावर घेण्यास समर्थ आहे मी.

ज्याने लिहिलं, त्याच्याकडे कारणे असतील जबाबदारी झटकण्यामागे. आपल्या देशात व्यक्तिपूजा करणा-यांना पचत नाही कुणी त्यांच्या आवडत्या व्यक्तीबद्दल बोललेले. उगाच वादात का पडावं म्हणून त्यांनी उडवलं असेल आर्टकिल. माझ्यावर नाही दबाव कुणाचा. शिवाय ते फक्त एक मत आहे, जे मी माझ्या ब्लॉगवर ठेवू शकतो इतरांना वाचायला.

राहिला विचार पटण्याचा. लेखामध्ये तथ्य आहे आणि ते उघड आहे. काल सचिनने त्या ढोंगी माणसासाठी केलेला एकूण प्रकार पाहून कुणाही विवेकी चाहत्याची सटकणे स्वाभाविक होते.. बालकांवर लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप असणा-या बाबासाठी सचिनने चाहत्यांना आवाहन करणे त्याच्या स्वत:च्या इमेजला शोभणारे नव्हते.’’

असं सागर सुरंजे यांच्या कॉमेंटला (हा लेख तुमचा की दुस-याचा, या प्रश्नाला) दिलेल्या उत्तरात वैभव लिहून जातो.. भडाभडा! तरीही वैभवच्या ब्लॉगवर त्याचं स्वत:चं लिखाण का नसावं, असा प्रश्न पडतो.
 सत्यसाईंचा बडेजाव चुकीचाच असल्याच्या मतामध्ये या बाबांचं निधन हा अडसर नाही. उलट, सत्यसाईंवरला विचारी लोकांचा राग-वैतागच निधनाच्या बातमीनंतर प्रकट होणार होता. यशस्वी मॉडेल आणि क्रिकेटपटू श्रीयुत स. र. तेंडुलकर यांनी साईबाबांपायी वाढदिवस रद्द झाल्याची उद्घोषणाच ट्विटरवरून केल्यावर आणि मीडियानं तिला टीकेऐवजी प्रसिद्धी दिल्यावर हा वैताग आणखी वाढला. मात्र, बाबांवरला आणि त्यांच्या भगतगणांवरला वैताग मराठी ब्लॉगांवर फार चांगल्या प्रकारे मार्गी लागलाय, असं चित्र सार्वत्रिक नाही. चारपाचच ब्लॉगांवर हा वैताग सापडतो. पण इथंही ‘‘आपण सामान्य लोक अशा बाबांच्या भोंदूगिरीबद्दल त्यांचे चमत्कार कसे खोटे आहेत याबद्दल बोलतो. युटय़ूबवरील त्याचे व्हिडिओ शेअर करतो या गोष्टी या (सेलेब्रिटी) लोकांना माहिती नसतात का किंवा कळत नाहीत का?
बाबागिरी आणि आपला देश कितीही प्रयत्न केलातरी वेगळा करता येणार नाही हे आपण पाहात आलो आहोत आणि पाहात राहणार आहोत असेच दिसून येत आहे. चला बाबांच्या चमत्काराची नाही तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहूयात.’’ अशी स्थितीवादी भूमिकाच जिंकते आहे! सत्यसाईंनंतर भारतात, महाराष्ट्रात किती बाबा-महाराजांनी ‘सेलेब्रिटी फॉर्म्युला’ वापरला हे आपण पाहातो आहोतच, ते सर्वजण जिंकत आहेत, अशी कबुलीच ‘विक्रम एक शांत वादळ’ या नावानं लिहिल्या जाणा-या ‘जीवनमूल्य’ नावाच्या या ब्लॉगवरून अभावितपणे मिळाली आहे. (http://jivanmulya.blogspot.com/2011/04/blog-post_25.html)

सत्यसाईंच्या कथित लीलांना थेट आव्हान देणारं आणि त्यांच्या गैर/ गुन्हेगारी व्यवहारांचा पाढा वाचणारं लिखाण जर कुठे असेल, तर ते आपण आपल्या ब्लॉगवरून लोकांपर्यंत पोहोचवलंच पाहिजे, अशी तळमळ पहिल्यांदा दाखवली ती पुण्याच्या जयंत कुलकर्णी यांनी.  (http://jayantpune.wordpress.com/2010/05/13/)रॅशनलिस्ट सोसायटीचे सरचिटणीस बाबू गोगिनेनी यांच्या ‘सत्यसाईबाबा- परत सांगितलीच पाहिजे अशी कहाणी’ या पुस्तकाचे अंश दोन भागांत 13 मे 2010 रोजी ‘माझे मराठीतील लेखन’ या ब्लॉगवर प्रकटवले. मिसळपाववरही हे लिखाण उपलब्ध होतेच. त्या लेखांवर तेव्हाही प्रतिक्रिया आल्या होत्या, ‘मिसळपाव’ आणि ‘उपक्रम’ या नेटवरल्या चर्चामंडळांमध्ये जे संस्कृतिरक्षक असतात त्यांच्यापैकी एकाने ‘घुमाके स्टाइल’ने अ‍ॅटिटय़ूड दाखवून, लेखकाच्या हेतूचा कचराच करण्याचा चमत्कारही केला होता. पण सुमारे वर्षभराने- सत्यसाईंच्या निधनानंतर पुन्हा हा लेख फेसबुकवरून ‘शेअर’ केला गेला, त्याला ताज्या प्रतिक्रियाही आल्या. यापैकी एका प्रतिक्रियेत ‘कौस्तुभ गुरव, अंबरनाथ’ याच्या ब्लॉगवर हा लेख कॉपी झाल्याचा ठपका नामवंत मराठी फोटोब्लॉगर पंकज झरेकर यांनी ठेवला आहे. मुळात जयंत कुलकर्णी यांनी ज्या पुस्तकाला श्रेय दिलं, त्या पुस्तकाचं श्रेय कौस्तुभ यांनी कायम राखलं आहे. पण जयंत कुलकर्णी यांनी ज्याचं मराठी भाषांतर ब्लॉगवाचकांसमोर दोन भागांत आणलं, तो मूळ इंग्रजी लेख तशाच दोन भागांत http://saibaba-invigilator.blogspot.com या ब्लॉगवर होता आणि त्याचं श्रेय त्यांच्या ब्लॉगवर तरी नाही. शब्दश: भाषांतर जयंत यांच्या ब्लॉगवर, तर त्या भाषांतराचा संपादित अंश कौस्तुभ यांच्या ब्लॉगवर, असा प्रकार आहे. मात्र कौस्तुभ यांची ‘‘आशा भोसले यांनी एक जावई शोध लावला. म्हणे हा मृत्यू नाही तर समाधी आहे. ’’ ही नापसंती इथं व्यक्त होते तेव्हा एपीजे अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत आणखी एकाची भर पडते! (http://kaustubhfrmamb.blogspot.com/2011/04/blog-post_7836.html)

जयंत कुलकर्णी ज्येष्ठच ब्लॉगर आहेत, त्यामुळे ही चर्चा अधिक महत्त्वाची. पुस्तकाचा उल्लेख केलात, मग आता ते कुठे मिळेल किंवा मूळ इंग्रजी कुठं आहे हेही तुम्हीच सांगा, हा आग्रह योग्य की अयोग्य, हे कुलकर्णी त्यांच्या ब्लॉगसंदर्भात ठरवतील. पण मुळाची चाड असेल, तर ती खरोखरच्या मुळापासूनच असली पाहिजे. कुलकर्णी यांनी सत्यसाईंच्या निधनानंतर कलाम/ तेंडुलकर यांच्या संदर्भात काही गंभीर चर्चा करण्याचा प्रयत्न ‘सत्यसाईबाबा, सचिन, कलाम, आणि इतर मान्यवर.. व सरकार.’ या ताज्या नोंदीत केलेला आहे. इथे त्यांना बहुधा पुरेसा वेळ मिळाला नसावा.. त्या लिखाणाचा एकंदर सूर जाणण्यासाठी ते वाचावं, पण ‘बंगालमधला कम्युनिस्ट’ आदी धोपटपाठ जयंत यांनी वापरले आहेत ते लक्षात ठेवण्याजोगे नाहीत.

जयंत कुलकर्णी यांना मानलं पाहिजे, ते त्यांनी गोगिनेनींच्या पुस्तकाचं भाषांतर देण्याआधी, सत्यसाईंवरल्या स्वत:च्या नापसंतीचं जे कारण सूचित केलं आहे त्यासाठी! ‘‘जवळजवळ सर्वजणांनी बाबा आले त्यामुळे आमच्या गावाचे रस्ते झाले ही बाबांचीच कृपा झाली असे सांगितले. याऐवजी त्यांनी रस्ते न करणा-या नोकरशाहीला धारेवर धरले असते तरी चालले असते. बाबांच्या कार्यक्रमासाठी नोकरशाही राबली असेलच. पोलिस तर निश्चितच राबले असतील. याचा खर्च आपल्या खिशातून गेला आहे हे लक्षात घ्या.’’ असं जयंत लिहून जातात. हा प्रवाही विचारशीलपणा जयंत यांच्या लिखाणात नेहमीच दिसतो.
 ‘ससाबा’ हे लघुनाम सत्यसाईबाबांसाठी ‘उपक्रम’मधल्या ‘डार्क मॅटर’नामक चर्चाकारानं 6 एप्रिलच्या चर्चेत वापरलं. विचारी निर्णयशीलपणा आणि स्थितीवादीपणा यांचं जे काही वाग्युद्ध ‘उपक्रम’ वर सुरू असतं, त्याला साजेशीच ही चर्चा आहे. सेलेब्रिटी आणि बाबा - ससाबाच नव्हे, कोणतेही बाबा, यांच्या नात्याबद्दलची मतं फक्त स्थितीवादी नाहीत, असा विश्वास या चर्चेतून सध्यातरी मिळतो आहे. सध्यातरी अशासाठी की, चर्चेचा हा उपक्रम आपापल्याच महाविचारांच्या दावणीला बांधण्यास अनेक महाभाग समर्थ आहेतच! ‘ब्लॉगार्क’चं काम ससाबांबद्दल मतप्रदर्शनाचं नाही.. मृत्यूनंतर स्वर्ग/नरक, जन्नत/ जहन्नम, हेवन/हेल मध्ये आत्मा जात असल्याची श्रद्धा अनेक धर्मात असेल, पण त्याची चिंता इथे नको.. ससाबांचं मरणोत्तर ‘ब्लॉगारोहण’ कसकसं होतंय हे पाहणं हे मात्र आपलं काम आहे.

हापूसचे गोडवे


आंबा पिढय़ानपिढय़ा खाणारा जो सामाजिक स्तर होता तोच निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी ब्लॉग लिहिण्यातही आता अग्रेसर आहे. जातींचं अस्तित्वच मोडून-तोडून काढण्याची, विद्रोहाची गरज या वर्गाला वाटत नसल्यामुळे असेल, पण आपण जात मानत नसलो तरीही जातींचं अस्तित्व मान्य करण्याकडे या वर्गाचा कल आहे....

‘‘आजकाल हा कोकणचा राजा झिम्मा खेळायचे सोडून लपंडाव आणि खोखो (मद्रासी भावाबरोबर) हेच खेळ जास्त खेळायला लागला आहे. मी भारतात परतून चार वर्षं झालीपण दर वर्षीयंदा आंबा कमी’ हेच पेपरात वाचतोय.’’ अशी खुमासदार सुरुवात करून हापूस आंब्यावर अख्खी ब्लॉग-नोंद पुणेकर (मुक्काम वाकड) निरंजन क-हाडे यांनी लिहिलीय! (http://sukameva.wordpress.com/2010/05/17) बाकीच्यांनीही आठवणी काढल्यात हापूसच्यापण ही क-हाडेंची नोंद मुळातून वाचण्यासारखी आहे. बाकीच्या नोंदी वाचताना त्यात आत्मगत जास्त असतं. सद्यस्थिती लोकांना सांगताना आपण लोकांपेक्षा निराळं लिहिलं पाहिजेअसा विचार ब्लॉगला स्वान्तसुखाय’ मानल्यास केला जात नाही. क-हाडे मात्र सहसा,वाचनीयतेचा विचार करतात असं दिसतं.
 
पण म्हणून आत्मपर आणि स्वान्तसुखाच्या नोंदी वाचनीयच नाहीतअसंही नाही.. हापूसबद्दल तरअशा नोंदीच महत्त्वाच्या ठरतात कारण त्या एका फळाबद्दलच्या सामाजिक आठवणींचा दस्तऐवज’ ठरतात. आंबा पिढय़ानपिढय़ा खाणारा जो सामाजिक स्तर होता तोच निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी ब्लॉग लिहिण्यातही आता अग्रेसर आहे. जातींचं अस्तित्वच मोडून-तोडून काढण्याचीविद्रोहाची गरज या वर्गाला वाटत नसल्यामुळे असेलपण आपण जात मानत नसलो तरीही जातींचं अस्तित्व मान्य करण्याकडे या वर्गाचा कल आहे. काही ब्लॉग-नोंदी खूप जवळिकीनं वाचताना हे आत्मपरीक्षण याच वर्गातल्या वाचकांनाही करता येईल. उदाहरण म्हणून सगळे आंबे काही एका घराण्यातले नसायचे. कोणी देवगडचाकोणी रत्नागिरीचा. आणि घराणे जसे वेगळे तसे घराण्यात परत जातीकोणी हापूसकोणी पायरीकोणी तोतापुरी आणि पारंपरिक जातीय पद्धती प्रमाणे आंब्याला मानाची वागणूक मिळत असे. हापूसची स्वारी मानाप्रमाणे छान पेटी मध्ये वगरे असायची. या उलट तोतापुरीच्या वाट्याला कोपरयातील टोपली!’ हे शब्द नीट वाचून पहा. पुण्याच्या अभिजीतनं मनापासून आणि अगदी संवादीपणे लिहिलेली अख्खी नोंदही वाचा. जातीची उच्च-नीचता आणि जातीची उपयुक्तता यांचा थेट संबंध सध्या हापूसमध्ये जोडता येतोयअसं तरी वाटेलच ! (http://abhya.blogspot.com/2010_05_02_archive.html)
 
ब्लॉगवर मराठीत लिहिणा-यांच्याही जाती-पंथ लिखाणानुसार आहेतच.. इथं कविता करणारे फारच स्वान्तसुखाय लिखाणवाले असतात आणि त्यांना तसंच-तिथंच ठेवणं वाचकांच्याही हिताचं आहेम्हणून एरवी ब्लॉगार्क’ कविताबिवितांना दूरच ठेवणारपण सॅन होजेला राहणारे ज्येष्ठ आंबाप्रेमी गद्य- ब्लॉगर श्रीकृष्ण सामंत यांनाही लपविलास तू हापूस आंबा सुगंध त्याचा लपेल काबाठा चोखून खपेल का?’ अशा बिडंबन-ओळी सुचाव्यात इतकी गोडी हापूसमध्ये आहे. (http://shrikrishnas.blogspot.com/2008/03/blog-post_06.html आणिhttp://shrikrishnasamant.wordpress.com/2009/10/30/)  सामंतकाका मूळचे गोंयकारत्यामुळे वाचनीय लिखाणात जरा गोव्याचा उल्लेख असेल तर त्यांना स्वान्तसुख मिळत असावं! हापूसचे गोडवे गाणा-या किमान तीन नोंदी दोन ब्लॉगांवर करणा-या सामंतकाकांच्या आंबेआठवणींचा एक कप्पा गोव्यातच आहे माडकूर आंब्यात जरी हापूसच्या आंब्याचे सर्व गूण नसले तरी पिकलेल्या आंब्याचा बाहेरून दिसणारा केशरी रंगआणि त्याचा जास्त गोलट आकार,पाहून आकर्शीत व्हायला होतं.आणि चव विचाराल तर अगदी स्वर्गातलं अमृत मागे पडेल.’ असं ते अगदी ओघानं - जोगीण झालेल्या ज्यूलीच्या गोष्टीत- लिहून जातात. आणखी एक गोमंतकीय मराठी ब्लॉगर गौतम सोमण लिहितात , ‘‘आंब्यांमधील बेताज बादशहा म्हणजे हापूस. मला स्वत:ला मात्र हापूस-इतकाच आमच्या गोव्याचा मानकुराद आंबाही तेव्हढाच प्रिय आहे. शिवाय,घरचं झाड असल्याने मनसोक्त खायची सोय! ’’ (http://gsnapshots.blogspot.com/2010/05/mango-delight.html)
 
हापूसचआणि तोही देवगड/ रत्नागिरीचाचया प्रौढीला थोडा छेद देणारंकदाचित आंब्यांतल्या जातिव्यवस्थेला आव्हान देणारं काहीतरी असा आहे आडिवरेचा परिसर’ या अवीट बागले यांच्या नोंदीत सापडतं. ‘‘सरकारने फलोत्पादनाला शंभर टक्के अनुदानाची योजना राबविली आणि कातळावर आंब्याच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. त्या आंब्यालाही वेगळीच चव असते. त्यामुळे रत्नागिरीदेवगड हापूस मागोमाग आडिवरे हापूस प्रसिद्ध झाला तर आश्चर्य वाटायला नको.’’ असं ते लिहितात.. त्याची शहानिशा अर्थातच व्हायची आहे. (http://avitbagle.blogspot.com/2011/04/blog-post_21.html)
 
हे सदर नुसत्या गप्पांचं नाही आणि इथं ब्लॉग-नोंदींबद्दल पॉझिटिव्ह मतप्रदर्शन केलं जातंचपण काहीवेळा काही नोंदींना दाद देण्याचा मोह होतो तेव्हा आपण ब्लॉग या सार्वत्रिक माध्यमालाच खरी दाद देताहोतयाचीही जाणीव होते.. ‘‘कित्येक वेळा हापूस म्हणून मद्रास / बंगलोरचा टुकार आंबा घेऊन आलो आहे. मग नंतर आंब्याच्या पेटीतील पेपर पाहून कोकणातला आहे की नाही हे पाहू लागलो. कोणाला माहीतहे विक्रेते कोकणातून रद्दी आणून त्यात मद्रासचा आंबा पॅक करतही असतील.’’ हे असं स्वच्छआत्मीय आणि खुसखुशीत लिखाण- ब्लॉगांशिवाय कुठे वाचता येतं हल्ली? (माहितीसाठी : हेही वाक्य निरंजन क-हाडेंचंच)
 आंबा पिकणार आहेच यंदाहीसोबत ब्लॉगही फुलणारच आहेत. त्यामुळे ब्लॉगार्कमध्ये आंब्याबद्दलचं लिखाण एकाच भागात संपवू नयेअसं वाटतंय.. अनेक चांगले ब्लॉगर जसे भाग पाडूनलहान-लहान नोंदी लिहिताततसं आपण लिहावं,असा विचार इथं आहे. कुणी म्हणेल या सदराचं नाव ब्लॉगार्क’ आहे की ब्लॉगांबा’? .. म्हणू देत!