Thursday 5 May 2011

ससाबांचं ब्लॉगारोहण


‘ससाबा’ हे लघुनाम सत्यसाईबाबांसाठी ‘उपक्रम’मधल्या ‘डार्क मॅटर’नामक चर्चाकारानं 6 एप्रिलच्या चर्चेत वापरलं. विचारी निर्णयशीलपणा आणि स्थितीवादीपणा यांचं जे काही वाग्युद्ध ‘उपक्रम’ वर सुरू असतं, त्याला साजेशीच ही चर्चा आहे. सेलेब्रिटी आणि बाबा - ससाबाच नव्हे, कोणतेही बाबा, यांच्या नात्याबद्दलची मतं फक्त स्थितीवादी नाहीत, असा विश्वास या चर्चेतून सध्यातरी मिळतो आहे

‘‘गेले एकदाचे हे बाबा.. खूप दुख झाले असेल ना सचिन.. अरे सचिन तुझ्या जितक्या धावा आहेत ना तितकी कुपोषित बालके रोज मेली.. तितक्याच मुली आईच्या गर्भात मारल्या गेल्या, तितक्याच शेतक-यांनी आत्महत्या केल्या.. ना त्या पुत्तापार्थीला कंठ फुटला ना तुला ना त्या तुझा षटकार पाहून कंठ फुटणा-या लताबाई मंगेशकरांना ..’’ अशा शब्दांतलं लिखाण भावनिकच वाटणार, विचारी वाटणार नाही, हे उघड आहे. लिखाणाची धार वाढण्यासाठी, शब्द अधिक बोचरे होण्यासाठी भावनेचा भर आवश्यक आहे, हेही मान्य. पण रूढार्थानं ब्लॉग-सभ्यतेचे संकेत न पाळणारं हे लिखाण मी माझ्या ब्लॉगवर ठेवेन, कारण लोकांनी ते वाचलंच पाहिजे हा वैभव गायकवाडचा निश्चयीपणा पाहून मात्र, संकेत वगैरे बाजूला ठेवून दाद देण्याजोगा आहे. (http://www.vaibhavgaikwad.com/2011/04/blog-post_24.html)

हा वैभव गायकवाड जो ब्लॉग चालवतो, तिथं अन्य ब्लॉगांवर छापून आलेले लेखच लिंकसकट असतात. सचिनवरल्या लेखाची लिंक मात्र नाही. ‘ब्लॉगार्क’ सजग असल्यानं दररोज अनेक ब्लॉग पाहिले जातात, त्यावेळी हे लिखाण मात्र फक्त वैभवच्याच ब्लॉगवर सापडलंय. तरीही वैभवनं कॉमेंटमध्ये दावा केलाय की सचिनला हे अनावृत पत्र त्यानं लिहिलेलं नाही. ‘‘गुगलवर सचिन आणि सत्यसाईबाबा सर्च करता-करता मिळाला. मी तिकडून उचलून परत माझ्या ब्लॉगवर पोस्ट केला. सुरुवातीला लिंक टाकली होती, पण मी आर्टकिल पोस्ट करेपर्यंत मूळ आर्टकिल काढून टाकलं गेलं. त्यांना बहुतेक शिव्यांचा मार झेपला नसावा. मला काही फरक पडत नाही कुणाच्याही भुंकण्याने. मी तसंच ठेवलं आर्टकिल.

कुणाचे श्रेय लाटण्याचा हेतू नाही. एरवी मी कायम लिंक्स देत आलोय. पण या आर्टकिल संदर्भात मी लिंक न केलेले चांगले. त्यांना पडणा-या शिव्या माझ्या अंगावर घेण्यास समर्थ आहे मी.

ज्याने लिहिलं, त्याच्याकडे कारणे असतील जबाबदारी झटकण्यामागे. आपल्या देशात व्यक्तिपूजा करणा-यांना पचत नाही कुणी त्यांच्या आवडत्या व्यक्तीबद्दल बोललेले. उगाच वादात का पडावं म्हणून त्यांनी उडवलं असेल आर्टकिल. माझ्यावर नाही दबाव कुणाचा. शिवाय ते फक्त एक मत आहे, जे मी माझ्या ब्लॉगवर ठेवू शकतो इतरांना वाचायला.

राहिला विचार पटण्याचा. लेखामध्ये तथ्य आहे आणि ते उघड आहे. काल सचिनने त्या ढोंगी माणसासाठी केलेला एकूण प्रकार पाहून कुणाही विवेकी चाहत्याची सटकणे स्वाभाविक होते.. बालकांवर लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप असणा-या बाबासाठी सचिनने चाहत्यांना आवाहन करणे त्याच्या स्वत:च्या इमेजला शोभणारे नव्हते.’’

असं सागर सुरंजे यांच्या कॉमेंटला (हा लेख तुमचा की दुस-याचा, या प्रश्नाला) दिलेल्या उत्तरात वैभव लिहून जातो.. भडाभडा! तरीही वैभवच्या ब्लॉगवर त्याचं स्वत:चं लिखाण का नसावं, असा प्रश्न पडतो.
 सत्यसाईंचा बडेजाव चुकीचाच असल्याच्या मतामध्ये या बाबांचं निधन हा अडसर नाही. उलट, सत्यसाईंवरला विचारी लोकांचा राग-वैतागच निधनाच्या बातमीनंतर प्रकट होणार होता. यशस्वी मॉडेल आणि क्रिकेटपटू श्रीयुत स. र. तेंडुलकर यांनी साईबाबांपायी वाढदिवस रद्द झाल्याची उद्घोषणाच ट्विटरवरून केल्यावर आणि मीडियानं तिला टीकेऐवजी प्रसिद्धी दिल्यावर हा वैताग आणखी वाढला. मात्र, बाबांवरला आणि त्यांच्या भगतगणांवरला वैताग मराठी ब्लॉगांवर फार चांगल्या प्रकारे मार्गी लागलाय, असं चित्र सार्वत्रिक नाही. चारपाचच ब्लॉगांवर हा वैताग सापडतो. पण इथंही ‘‘आपण सामान्य लोक अशा बाबांच्या भोंदूगिरीबद्दल त्यांचे चमत्कार कसे खोटे आहेत याबद्दल बोलतो. युटय़ूबवरील त्याचे व्हिडिओ शेअर करतो या गोष्टी या (सेलेब्रिटी) लोकांना माहिती नसतात का किंवा कळत नाहीत का?
बाबागिरी आणि आपला देश कितीही प्रयत्न केलातरी वेगळा करता येणार नाही हे आपण पाहात आलो आहोत आणि पाहात राहणार आहोत असेच दिसून येत आहे. चला बाबांच्या चमत्काराची नाही तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहूयात.’’ अशी स्थितीवादी भूमिकाच जिंकते आहे! सत्यसाईंनंतर भारतात, महाराष्ट्रात किती बाबा-महाराजांनी ‘सेलेब्रिटी फॉर्म्युला’ वापरला हे आपण पाहातो आहोतच, ते सर्वजण जिंकत आहेत, अशी कबुलीच ‘विक्रम एक शांत वादळ’ या नावानं लिहिल्या जाणा-या ‘जीवनमूल्य’ नावाच्या या ब्लॉगवरून अभावितपणे मिळाली आहे. (http://jivanmulya.blogspot.com/2011/04/blog-post_25.html)

सत्यसाईंच्या कथित लीलांना थेट आव्हान देणारं आणि त्यांच्या गैर/ गुन्हेगारी व्यवहारांचा पाढा वाचणारं लिखाण जर कुठे असेल, तर ते आपण आपल्या ब्लॉगवरून लोकांपर्यंत पोहोचवलंच पाहिजे, अशी तळमळ पहिल्यांदा दाखवली ती पुण्याच्या जयंत कुलकर्णी यांनी.  (http://jayantpune.wordpress.com/2010/05/13/)रॅशनलिस्ट सोसायटीचे सरचिटणीस बाबू गोगिनेनी यांच्या ‘सत्यसाईबाबा- परत सांगितलीच पाहिजे अशी कहाणी’ या पुस्तकाचे अंश दोन भागांत 13 मे 2010 रोजी ‘माझे मराठीतील लेखन’ या ब्लॉगवर प्रकटवले. मिसळपाववरही हे लिखाण उपलब्ध होतेच. त्या लेखांवर तेव्हाही प्रतिक्रिया आल्या होत्या, ‘मिसळपाव’ आणि ‘उपक्रम’ या नेटवरल्या चर्चामंडळांमध्ये जे संस्कृतिरक्षक असतात त्यांच्यापैकी एकाने ‘घुमाके स्टाइल’ने अ‍ॅटिटय़ूड दाखवून, लेखकाच्या हेतूचा कचराच करण्याचा चमत्कारही केला होता. पण सुमारे वर्षभराने- सत्यसाईंच्या निधनानंतर पुन्हा हा लेख फेसबुकवरून ‘शेअर’ केला गेला, त्याला ताज्या प्रतिक्रियाही आल्या. यापैकी एका प्रतिक्रियेत ‘कौस्तुभ गुरव, अंबरनाथ’ याच्या ब्लॉगवर हा लेख कॉपी झाल्याचा ठपका नामवंत मराठी फोटोब्लॉगर पंकज झरेकर यांनी ठेवला आहे. मुळात जयंत कुलकर्णी यांनी ज्या पुस्तकाला श्रेय दिलं, त्या पुस्तकाचं श्रेय कौस्तुभ यांनी कायम राखलं आहे. पण जयंत कुलकर्णी यांनी ज्याचं मराठी भाषांतर ब्लॉगवाचकांसमोर दोन भागांत आणलं, तो मूळ इंग्रजी लेख तशाच दोन भागांत http://saibaba-invigilator.blogspot.com या ब्लॉगवर होता आणि त्याचं श्रेय त्यांच्या ब्लॉगवर तरी नाही. शब्दश: भाषांतर जयंत यांच्या ब्लॉगवर, तर त्या भाषांतराचा संपादित अंश कौस्तुभ यांच्या ब्लॉगवर, असा प्रकार आहे. मात्र कौस्तुभ यांची ‘‘आशा भोसले यांनी एक जावई शोध लावला. म्हणे हा मृत्यू नाही तर समाधी आहे. ’’ ही नापसंती इथं व्यक्त होते तेव्हा एपीजे अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत आणखी एकाची भर पडते! (http://kaustubhfrmamb.blogspot.com/2011/04/blog-post_7836.html)

जयंत कुलकर्णी ज्येष्ठच ब्लॉगर आहेत, त्यामुळे ही चर्चा अधिक महत्त्वाची. पुस्तकाचा उल्लेख केलात, मग आता ते कुठे मिळेल किंवा मूळ इंग्रजी कुठं आहे हेही तुम्हीच सांगा, हा आग्रह योग्य की अयोग्य, हे कुलकर्णी त्यांच्या ब्लॉगसंदर्भात ठरवतील. पण मुळाची चाड असेल, तर ती खरोखरच्या मुळापासूनच असली पाहिजे. कुलकर्णी यांनी सत्यसाईंच्या निधनानंतर कलाम/ तेंडुलकर यांच्या संदर्भात काही गंभीर चर्चा करण्याचा प्रयत्न ‘सत्यसाईबाबा, सचिन, कलाम, आणि इतर मान्यवर.. व सरकार.’ या ताज्या नोंदीत केलेला आहे. इथे त्यांना बहुधा पुरेसा वेळ मिळाला नसावा.. त्या लिखाणाचा एकंदर सूर जाणण्यासाठी ते वाचावं, पण ‘बंगालमधला कम्युनिस्ट’ आदी धोपटपाठ जयंत यांनी वापरले आहेत ते लक्षात ठेवण्याजोगे नाहीत.

जयंत कुलकर्णी यांना मानलं पाहिजे, ते त्यांनी गोगिनेनींच्या पुस्तकाचं भाषांतर देण्याआधी, सत्यसाईंवरल्या स्वत:च्या नापसंतीचं जे कारण सूचित केलं आहे त्यासाठी! ‘‘जवळजवळ सर्वजणांनी बाबा आले त्यामुळे आमच्या गावाचे रस्ते झाले ही बाबांचीच कृपा झाली असे सांगितले. याऐवजी त्यांनी रस्ते न करणा-या नोकरशाहीला धारेवर धरले असते तरी चालले असते. बाबांच्या कार्यक्रमासाठी नोकरशाही राबली असेलच. पोलिस तर निश्चितच राबले असतील. याचा खर्च आपल्या खिशातून गेला आहे हे लक्षात घ्या.’’ असं जयंत लिहून जातात. हा प्रवाही विचारशीलपणा जयंत यांच्या लिखाणात नेहमीच दिसतो.
 ‘ससाबा’ हे लघुनाम सत्यसाईबाबांसाठी ‘उपक्रम’मधल्या ‘डार्क मॅटर’नामक चर्चाकारानं 6 एप्रिलच्या चर्चेत वापरलं. विचारी निर्णयशीलपणा आणि स्थितीवादीपणा यांचं जे काही वाग्युद्ध ‘उपक्रम’ वर सुरू असतं, त्याला साजेशीच ही चर्चा आहे. सेलेब्रिटी आणि बाबा - ससाबाच नव्हे, कोणतेही बाबा, यांच्या नात्याबद्दलची मतं फक्त स्थितीवादी नाहीत, असा विश्वास या चर्चेतून सध्यातरी मिळतो आहे. सध्यातरी अशासाठी की, चर्चेचा हा उपक्रम आपापल्याच महाविचारांच्या दावणीला बांधण्यास अनेक महाभाग समर्थ आहेतच! ‘ब्लॉगार्क’चं काम ससाबांबद्दल मतप्रदर्शनाचं नाही.. मृत्यूनंतर स्वर्ग/नरक, जन्नत/ जहन्नम, हेवन/हेल मध्ये आत्मा जात असल्याची श्रद्धा अनेक धर्मात असेल, पण त्याची चिंता इथे नको.. ससाबांचं मरणोत्तर ‘ब्लॉगारोहण’ कसकसं होतंय हे पाहणं हे मात्र आपलं काम आहे.

No comments:

Post a Comment