Sunday 15 May 2011

शैली आणि माहिती, मतं आणि आच!


समीक्षा नेटके हे नाव आता ब-याच मराठी ब्लॉगरांच्या ब्लॉगांवर, ‘फॉलोअर्स’ म्हणजे ‘सदस्यां’च्या यादीत तुम्हाला पाहायला मिळेल. सदस्यता नसलेले ब्लॉग अर्थातच, या सदराच्या निमित्तानं वाचले जातात. मात्र, ब्लॉगचं वाचक-सदस्य झाल्यावर त्या ब्लॉगशी जोडलं गेल्यासारखं वाटतं, असा अनुभव अनेकांचा असेल. मग त्यापैकी एखादा ब्लॉग शैलीसाठी, दुसरा माहितीमुळे तर तिसरा मतांकरता लक्षात राहतोय,असंही होत असेल. असे तीन नमुने (‘आदर्श’ नको, नमुनेच बरे!) ठरणा-या तिघांचे ब्लॉग अगदी गेल्या चार दिवसांतच नव्यानं ‘अपडेट’ झालेले दिसले. व्यक्तिमत्त्व ब्लॉगमध्ये कसं उतरतं, याचा वस्तुपाठ आहेत हे तिघे! तसे आणखीही ब्लॉगर असणारच, कारण व्यक्तिमत्त्व ब्लॉगमध्ये उतरत नाही असं दिसलं की तो ब्लॉग जणू, लेखकाचा राहातच नाही आणि म्हणून- अशाच कारणासाठी अनेकांचं ब्लॉगलेखन थांबतं, थांबलंय. इथं खरंच कुणाचा उल्लेख आणि कुणाचा अनुल्लेख असं काही करायचं नाहिये.. ब्लॉगर.कॉमवरून सदस्यता घेतलेल्या 51 पैकी हे तीन ब्लॉग, म्हणजे उणेपुरे सहा टक्के! तरीही हे‘सँपल’ यथास्थित आहे, असं वाटलं आणि मुख्य म्हणजे या तिन्ही नोंदी वाचनीयच वाटतील, तुम्हालाही.

अभिजीत पुण्याचा आहे, हे त्याच्या ब्लॉग-नोंदींतल्या काही सांस्कृतिक आग्रहांवरूनही लक्षात येतं. ‘डीएसएलआर कॅमेरे- काही गैरसमज’ या ब-याच आधीच्या नोंदीचं नाव वाचून, ‘इथं अभिजीतची खुसखुशीत मतं नसतील, नुसती माहिती असेल,’ म्हणून वाचायला घेतलं तर इथंही (गं)मत आहेच! ‘डीएसएलआर कॅमेरा माझ्यासाठी आहे’ हा गैरसमज क्रमांक चार- आणि अखेरचा- अभिजीतनं ज्या तिखटपणे खोडलाय, त्यात त्याचे ‘सांस्कृतिक आग्रह’ दिसतील आणि ते आग्रह सुसंस्कृतदेखील आहेत, हे कळेल. अभिजीतची ताजी नोंद ‘फॉरवर्ड’ म्हणून पाठवावी असा मोह होण्यातली आहे (सांभाळा अभिजीतपंत.. हवं तर कॉपीगार्ड लावून घ्या!) ‘प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न’ या नोंदीची सुरुवातच, ‘‘एवढय़ा मोठमोठय़ा जाहिराती दाखवायला या टेलिमॉल नि स्कायशॉपवाल्यांकडे पैसा येतो कुठून? म्हणजे लोक खरंच त्यांच्या वस्तू खरेदी करतात? नजर रक्षा कवच आणि इंग्लिश गुरू ‘पैसे देऊन’ विकत घेणारे लोक या जगात आहेत?

स्वत:चं पुन्हा पुन्हा कौतुक करताना आपण किती हास्यास्पद दिसतो हे सचिन पिळगावकर साहेबांना कधी कळणार?’’

अशी आहे आणि शेवट,

‘‘पुण्याच्या वाहतुकीची दिवसेंदिवस अवघड होत जाणारी स्थिती पहाता काही वर्षानी ‘आम्ही स्वारगेटवरून शिवाजीनगरला एका तासात पोहोचत असू’ असं एखादे आजोबा आपल्या नातवाला सांगतील का?
 आयपीएल स्पर्धा जर वर्षातून तीनदा भरवली तर सध्याच्या तीनपट पैसे गोळा करता येतील हे आयपील आयोजकांच्या अजून लक्षात कसे आले नाही?’’
असो! संकीर्ण मतं आहेत ही, त्यामुळे या नोंदीच्या मजकुरात ओघ, सातत्य काही नाही. थोडी आयटमगिरी. एकेक वाक्यं.‘फॉरवर्ड’साठी उत्तम फॉर्म.

याउलटआनंद घारे  हे तारापूर अणुऊर्जा केंद्रातून निवृत्त झालेले, अणुभौतिकीचा अभ्यास आणि कुतूहल कायम ठेवणारे काका. त्यांनी याच आठवडय़ात ‘अणुऊर्जेपासून विजेची निर्मिती- भाग दोन’ ही नोंद प्रकाशित केलीय. घारे यांचा अभ्यास दांडगा, अधिकार मोठा आहे, हे त्यांचा ‘आनंदघन’ नावाचा ब्लॉग वाचताना जाणवतंच. घारे यांच्याकडे संशोधकी वा शास्त्रीय वृत्तीमुळे आलेला खुलेपणाही आहे.. उदाहरणार्थ, दोनेक महिन्यांपूर्वी ‘मोलेक्युल’ आणि ‘अ‍ॅटम’ला ‘अणू आणि परमाणू’ म्हणणा-या घारे यांनी 13 एप्रिलच्या नोंदीत लिहिलंय की, हे मराठी प्रतिशब्द चुकीचे असल्याचे मला या लेखांवरील चर्चेतून जाणवले. त्याऐवजी, सध्या जे अणु आणि रेणू हे शब्द आता प्रमाणभाषेत दिले जातात असे समजल्यामुळे मीही त्याच शब्दांचा वापर करेन! फुकुशिमा आणि जैतापूर हे राजकीय चर्चेचे विषय ठरल्यानंतर अनेकांनी अणुऊर्जाच ‘व्हिलन’ असल्याप्रमाणे बोलायला सुरुवात केली, अशा वेळी घारे यांनी हे लिखाण केली आहे. आधीचे तीन लेख झाल्यावर त्यांना कुणी ‘याचं पुस्तक चांगलं होईल’ हे सांगितलं की नाही माहीत नाही; पण मे महिन्यात त्यांनी अणुऊर्जा- वीजनिर्मिती यांचा इतिहास मांडणारं लिखाण सुरू केलं आहे. इतिहास लोकांना आवडायला हवा म्हणून घारे काही ‘अणुशाहीर’ नाहीत झालेले.. वैज्ञानिक काटेकोरपणा त्यांनी सोडलेला नाही, तरीही लोकांना समजेलशी उदाहरणं ते देतात. अणुभट्टीची ‘क्रिटिकॅलिटी’ म्हणजे काय, हे त्यांनी खूप सोपं करून सांगितलंय..

‘‘रिअ‍ॅक्टरमधले कॅड्मियम रॉड अनेक न्यूट्रॉन्सना गिळंकृत करत असल्यामुळे सुरुवातीला फिशन चेन रिअ‍ॅक्शन टिकत नव्हती. हे रॉड हळूहळू वर नेत गेल्यानंतर त्यांचा प्रभाव कमी होत गेला आणि असा क्षण आला की ही भंजनांची साखळी पुढे आपल्या आप चालत राहिली. याला ’क्रिटिकॅलिटी’ असे म्हणतात! त्यानंतर कॅड्मियम रॉड आणखी वर उचलले असते तर रिअ‍ॅक्टर ’सुपरक्रिटिकल’ झाला असता म्हणजे भंजनांची संख्या वेगाने वाढत गेली असती आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या ऊष्णतेची तीव्रता वाढत गेली असती. कॅड्मियम रॉड खाली सोडले असते तर रिअ‍ॅक्टर ’सबक्रिटिकल’ झाला असता म्हणजे भंजनांची संख्या वेगाने कमी होत जाऊन ती थांबली असती. या पहिल्या यशस्वी प्रयोगाला आता साठ वष्रे होत आली असली तरी आजसुद्धा जगातला प्रत्येक रिअ‍ॅक्टर अशाच प्रकारे सुरू केला जातो. आता हे कंट्रोल रॉड्स हाताने ओढत नाहीत, त्यासाठी यांत्रिक व्यवस्था असते एवढाच बदल त्यात झाला आहे. ’’

.. आणि आता तिसरी नोंद.. माहिती, संशोधकवृत्ती, मतं हे सगळं आणि त्याहीपेक्षा जाणीव आणि आच ज्यांच्या लिखाणात नेहमीच दिसते, त्या ‘इंद्रधनू’ मैत्रिणींच्या ब्लॉगवरली..त्यापैकी ‘भारतीय स्त्रीचं गृहिणीकरण- 1’ या नावाची ही नोंद विद्या कुळकर्णी यांनी लिहिलीय.

ती वाचून आज थांबूया.. विचारही करूया..

‘‘इंग्रजांनी जर आमच्यावर सत्ता गाजवायला नको असेल तर आपण आधी आपल्या स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे असं नवशिक्षितांना आणि सुधारकांना वाटायला लागलं.

मग व्हिक्टोरियन इंग्रजी गृहिणी ही प्रमाण मानून इथल्या स्त्रीचं गृहिणीकरण सुरू झालं.

पहिल्यांदा हे बंगालमधे झालं आणि नंतर हे महाराष्ट्रात सुरू झालं.

स्त्रियांनी शिकलं पाहिजे, सुधारलं पाहिजे असं ठरवलं गेलं.

स्त्रीचं काम काय? तर मुले सांभाळणं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, शिवण- टिपण करून घर व्यवस्थित ठेवणं वगरे वगरे.

स्त्रीने शिकायचं का? तर मुलांना शिक्षित आई मिळावी म्हणून. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून. तिने यासाठी गणित, शास्त्र हे शिकण्याची गरज नाही, तिने गृहविज्ञान शिकावं.

तिने वावरायचं कसं, बोलायचं कसं हे ही ठरवलं जावू लागलं.

आपण का शिकायचं? शिक्षण म्हणजे काय बरं? आपण का शिकलोय?..’’

No comments:

Post a Comment